मुंबई : संक्रमण शिबिरांमध्ये पुरेसे निवासी गाळे उपलब्ध नसल्यामुळे म्हाडाच्या मुंबई मंडळाने बीडीडी चाळींतील रहिवाशांना आता ११ महिन्यांचे घरभाडे एकत्रित देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव मंडळाने राज्य सरकारला पाठविला आहे. वरळी, ना. म.जोशी मार्ग आणि नायगावमधील रहिवाशांची पात्रता निश्चिती, तसेच इमारती रिकाम्या करून घेण्याच्या कामाला वेग देण्यात आला आहे.
हेही वाचा >>> खारकोपर लोकल दुर्घटनेच्या अहवालास विलंब; मुंबई विभागाऐवजी मुख्यालयातील अधिकारी दुर्घटनेची चौकशी करणार
दरम्यान, पुनर्वसित इमारतींचे बांधकाम होईपर्यंत मंडळाने पात्र रहिवाशांच्या निवासाची संक्रमण शिबिरात व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आतापर्यंत अनेक कुटुंबांना संक्रमण शिबिरात रवाना करण्यात आले आहे. मात्र मंडळाच्या संक्रमण शिबिरात पुरेसे गाळेच उपलब्ध नाहीत. त्यामुळे रहिवाशांच्या तात्पुरत्या स्थलांतराचा प्रश्न निर्माण झाला होता. मंडळाने अखेर या प्रश्नावर तोडगा काढला आहे. रहिवाशांना प्रति महिना २५ हजार रुपये घरभाडे देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. राहिवाशांनीही हा पर्याय मान्य केला आहे. पात्र रहिवाशांना पाच महिन्यांचे घरभाडे एकत्रित देण्यात येणार होते. मात्र बीडीडीवासियांनी ११ महिन्यांचे घरभाडे देण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य करण्यात आल्याची माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली. याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.