मुंबई : गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थनगर अर्थात पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील मूळ भाडेकरूंच्या ६७२ घरांचा समावेश असलेल्या पुनर्वसित इमारतींना नुकताच निवासी दाखला (ओसी) मिळाला आहे. त्यामुळे आता या घरांच्या वितरणाचा मार्ग मोकळा झाला असून पत्राचाळवासीयांची १७ वर्षांपासूनची हक्काच्या घराची प्रतीक्षा अखेर आता संपुष्टात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून मूळ भाडेकरूंना घरांचा ताबा देण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल उचलण्यात आले आहे. त्यानुसार १६ फेब्रुवारीला ६७२ घरांपैकी ६२९ घरांसाठी मंडळाकडून सोडत काढली जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष घराचा ताबा देण्यासंबंधीची कार्यवाही केली जाणार आहे.

एका खासगी विकासकाने २००७ मध्ये पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला होता. २००८ मध्ये येथील ६७२ घरे रिकामी करून इमारतींचे पाडकाम करण्यात आले. मात्र, काही वर्षांनंतर पुनर्विकास बंद पडला. विकासकाने काम अर्धवट सोडले आणि त्यानंतर विकासकाने या पुनर्विकासात मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याची बाब सिद्ध झाली. त्यानुसार विकासकाविरोधात कठोर कारवाई करून हा पुनर्विकास प्रकल्प राज्य सरकारने म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ताब्यात दिला.

दरम्यान, प्रकल्प वादात अडकल्याने, प्रकल्प अपूर्ण राहिल्याने मूळ भाडेकरूंची चिंता वाढली होती. मात्र अखेर मुंबई मंडळाने अपूर्ण स्थितीतील पुनर्वसित इमारतींसह मुंबई मंडळाच्या २०१६ च्या सोडतीतील ३०५ घरांचा समावेश असलेल्या इमारतीच्या कामाला सुरुवात केली. नुकतीच ही कामे पूर्ण झाली असून सोडतीतील इमारतीसाठी निवासी दाखला प्राप्त करून घेण्यात आला आहे. तर या इमारतीतील ३०५ विजेत्यांना घराचा ताबा देण्यास सुरुवात केली आहे. आता पत्राचाळीतील मूळ भाडेकरूंचीही हक्काच्या घरांची प्रतीक्षा जवळपास संपुष्टात आली आहे.

निवासी दाखला प्राप्त

पुनर्वसित इमारतींनाही गेल्या आठवड्यात निवासी दाखला प्राप्त झाला. त्यामुळे आता या घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय मंडळाने घेतला. त्यानुसार १६ फेब्रुवारीला ही सोडत काढण्यात येईल, अशी माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. एकूण ६७२ पैकी ६२९ मूळ भाडेकरूंनी मंडळाकडे कागदपत्रे सादर करून पात्रतानिश्चिती प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे सोडतीत ६२९ घरांचाच समावेश करण्यात येणार आहे, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. सोडतीद्वारे मूळ भाडेकरूंना कुठे आणि कोणते घर वितरित करायचे, हे निश्चित केले जाणार आहे. त्यामुळे ही सोडत मूळ भाडेकरूंसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहेच, पण हक्काच्या घराच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल असणार आहे.