मुंबई : ताडदेव येथील एमपी मिल कंपाऊंडमधील संक्रमण शिबिराच्या जागेवर नोकरदार महिलांसाठी २३ मजली वसतिगृह बांधण्यात येणार असून याबाबतचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावास मान्यता घेऊन शक्य तितक्या लवकर वसतिगृहाच्या बांधकामाला सुरुवात करण्याचे म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे नियोजन आहे. याअनुषंगाने म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी एमपी मिल कंपाऊंडमधील संक्रमण शिबिराच्या दोन इमारती तातडीने रिकाम्या करून त्याचे पाडकाम करण्याचे आदेश दुरुस्ती मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दक्षिण मुंबईतील उपकर प्राप्त इमारतींची जयस्वाल यांनी शुक्रवारी पाहणी केली. यावेळी त्यांनी अनेक इमारतींची पाहणी करून रहिवाशांबरोबर संवाद साधला. समूह पुनर्विकासासाठी अधिकाधिक रहिवाशांनी पुढे यावे, असे आवाहन यावेळी जयस्वाल यांनी रहिवाशांना केले. जयस्वाल यांनी यावेळी ताडदेवमधील एमपी मिलमधील जागेचीही पाहणी केली. या जागेवर नोकरदार महिलांसाठी २३ मजली वसतिगृह बांधण्याचा निर्णय दुरुस्ती मंडळाने घेतला आहे. यासाठी २०२१ पासून कार्यवाही सुरू आहे. मात्र अद्याप वसतिगृह मार्गी लागलेले नाही. मात्र आता लवकरच वसतिगृहाच्या कामाचा सुरुवात होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच वसतिगृहाचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. राज्य सरकारची मान्यता मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून वसतिगृहाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. मात्र त्याआधीच वसतिगृहाच्या कामातील मुख्य अडथळा दूर करणे आवश्यक आहे. एमपी मिल कंपाऊंडमधील संक्रमण शिबिराच्या जागेवर हे वसतिगृह बांधण्यात येणार आहे. त्यामुळे संक्रमण शिबिरातील सहा इमारती रिकाम्या करून त्यांचे पाडकाम करणे दुरुस्ती मंडळासाठी क्रमप्राप्त आहे. त्यानुसार मंडळाने चार इमारतींचे पाडकाम पूर्ण केले आहे. मात्र दोन इमारतींचे पाडकाम अद्यापही झालेले नाही.

संक्रमण शिबिराच्या दोन इमारतींमधील गाळे एका खासगी विकासकाला देण्यात आले आहेत. रहिवासी, विकासकांकडून हे गाळे रिकामे केले जात नसल्याने या इमारतींचे पाडकाम शिल्लक आहे. महिला वसतिगृहाच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करण्याचे नियोजन मंडळाचे आहे. या इमारतींचे पाडकाम त्याआधी होणे गरजेचे आहे. त्यामुळे पाहणी दौऱ्यात जयस्वाल यांनी या दोन इमारती तातडीने रिकाम्या करून त्यांचे पाडकाम करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. विकासकाने रहिवाशांना भाडे देऊ केल्याने लवकरच या इमारती रिकाम्या होतील, अशी माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी जयस्वाल यांना दिली. आता या दोन इमारतींचे पाडकाम करून लवकरच महिला वसतिगृहाच्या बांधकामाला सुरुवात केली जाण्याची शक्यता आहे.

असा आहे महिला वसतिगृह प्रकल्प

ताडदेवमधील एमपी मिल कंपाऊंडमधील संक्रमण शिबिराच्या पुनर्विकासाअंतर्गत वसतीगृहाचे बांधकाम

२३ मजली इमारत, २१५ गाळे, ३०० चौरस फुटांचे गाळे

६५.८० कोटी रुपये खर्च

इमारतीच्या तळमजल्यावर पाच दुकाने असणार असून या दुकानांद्वारे एटीएम, लाँड्री, दवाखाना, औषध दुकान, सलून अशा सुविधा असतील

पहिल्या मजल्यावर उपहारगृह, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर वाहनतळ

चौथ्या मजल्यावर योगासनासाठी आणि मनोरंजनासाठीची जागा, उर्वरित सर्व मजल्यावर निवासी गाळे