म्हाडाच्या मुंबई मंडळाने शीव, प्रतीक्षानगर परिसरात नवीन ५२८ घरांचा प्रकल्प हाती घेतला आहे. मध्यम गटासाठी ही घरे असून चारपैकी एका इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे. या घरांचे बांधकाम तीन वर्षांत पूर्ण करून सोडतीत समाविष्ट करण्यात येणार आहेत. आजघडीला मुंबई मंडळाकडे गृहनिर्मितीसाठी मोकळी जागा नाही. गेल्या काही वर्षांमध्ये पहाडी, गोरेगावशिवाय अन्यत्र कुठेही नवीन प्रकल्प हाती घेण्यात आलेला नाही.
मुंबई मंडळाने प्रतीक्षा नगरमधील एक भूखंड शोधून काढला असून या भूखंडांवर गृहनिर्माण प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे. प्रतीक्षानगर अभिन्यासात मुंबई मंडळाचे दोन भूखंड होते. यातील एका भूखंडावर अतिक्रमण असून दुसरा भूखंड आरक्षित होता. घरांची मागणी लक्षात घेता मंडळाने या दोन भूखंडाचे आरक्षण बदलून गृहनिर्मिती प्रकल्पाचा मार्ग मोकळा केल्याची माहिती मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
या भूखंडावर चार इमारती बांधण्यात येणार असून या इमारतींमध्ये मध्यम गटासाठी ७४७ चौरस फुटांच्या ५२८ घरांचा समावेश असणार आहे. चारपैकी एका इमारतीचे बांधकाम सुरू झाले आहे. सध्या पायाभरणीचे काम सुरू असून २०२५ मध्ये ५२८ घरांचे बांधकाम पूर्ण होईल, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. तीन वर्षांत ही घरे पूर्ण होणार असल्याने २०२४-२५ च्या सोडतीत ही घरे समाविष्ट होण्याची शक्यता आहे.