लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५३११ घरांसाठी शनिवार, २४ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोडत काढण्यात येणार आहे. ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहात ही सोडत काढण्यात येणार असून यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कोकण मंडळाने म्हाडा गृहनिर्माण, पंतप्रधान आवास योजना, २० टक्के सर्वसमावेशक योजना आणि प्रथम प्राधान्य योजनेतील ५३११ घरांच्या सोडतीच्या अर्जविक्री-स्वीकृतीला सप्टेंबर २०२३ मध्ये सुरुवात केली. मूळ वेळापत्रकानुसार ७ नोव्हेंबर रोजी सोडत काढण्यात येणार होती. मात्र अर्जविक्री-स्वीकृतीची मुदत संपुष्टात येण्यापूर्वीच कोकण मंडळाने त्याला मुदतवाढ दिली. घरांना म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्याने ही मुदतवाढ देण्यात आली.
आणखी वाचा-राजकीय वरचष्मा असलेल्या मजूर संस्थांवर शासन मेहेरबान!
परिणामी, ७ नोव्हेंबर रोजी काढण्यात येणारी सोडत लांबणीवर गेली. त्यानंतर १३ डिसेंबर रोजी सोडत काढण्यात येणार होती. पण प्रशाकीय कारण पुढे करीत मंडळाने १३ नोव्हेंबर रोजी काढण्यात येणारी सोडत रद्द केली. अर्जविक्री-अर्जस्वीकृती प्रक्रिया पूर्ण करून मंडळाने पात्र अर्जांची यादीही प्रसिद्ध केली. पण सोडतीची तारीख जाहीर केली जात नव्हती. त्यामुळे २४ हजारांहून अधिक अर्जदारांमध्ये नाराजी होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ मिळत नसल्याने सोडत रखडली होती.
आता मात्र मुखमंत्र्यांची वेळ मिळाल्याने सोडत मार्गी लागत आहे. शनिवार, २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीसाठी कोकण मंडळ सज्ज झाले आहे.