मुंबई : वांद्रे पूर्व येथील म्हाडाच्या निर्मलनगर अभिन्यासाचा खासगी विकासकाच्या माध्यमातून पुनर्विकास करण्यात येत आहे. या पुनर्विकासात मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिराच्या दोन इमारतींचाही समावेश करण्यात आला आहे. या दोन इमारतींच्या पुनर्विकासातून दुरूस्ती मंडळाला संक्रमण शिबिरासाठी ११० गाळे उपलब्ध होणार आहेत. त्याचवेळी वांद्रे पूर्वसारख्या ठिकाणी सोडतीसाठी मुंबई मंडळाला ३० घरे उपलब्ध होणार आहेत.
हेही वाचा >>> मुंबई : म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्यासह १२ जणांविरोधात मारहाणीचा गुन्हा, डांबून मारहाण केल्याचा तक्रारदाराचा आरोप
निर्मलनगरमधील इमारतींचा पुनर्विकास अनेक वर्षांपासून रखडला होता. आता मात्र हा पुनर्विकास मार्गी लागत आहे. अधिमूल्य (प्रिमियम) घेऊन या पुनर्विकासास म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे या पुनर्विकासाअंतर्गत म्हाडाला गृहसाठा (हाऊसिंग स्टाॅक) मिळणार नाही. मात्र त्याचवेळी या पुनर्विकासात या अभिन्यासातील संक्रमण शिबिराच्या दोन इमारतींचाही समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार नुकत्याच या इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. या दोन इमारतींच्या पुनर्विकासातून मुंबई मंडळाला भविष्यात सोडतीसाठी ३० घरे उपलब्ध होणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या दोन इमारतीत ८० गाळे होते. आता इमारतीच्या पुनर्विकासातून दुरूस्ती मंडळाला संक्रमण शिबिरासाठी ११० गाळे उपलब्ध होणार असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा >>> मुंबई : रे रोडमध्ये जलवाहिनी फुटली, शिवडी परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम
दुरूस्ती मंडळाला संक्रमण शिबिराच्या गाळ्यांची कमतरता असताना वांद्रे पूर्व येथे येत्या काही वर्षात ११० गाळे मिळणार असल्याने ही दिलासादायक बाब आहे. तर त्याचवेळी या संक्रमण शिबिराच्या पुनर्विकासातून अतिरिक्त ३० घरे उपलब्ध होणार आहेत. २७.८८ चौ. मीटरची पाच घरे, ३४.७२ चौ. मीटरची २३ घरे आणि ४७.८६ चौ. मीटरची दोन घरे मुंबई मंडळाला भविष्यात उपलब्ध होणार आहेत. या घरांची विक्री सोडतीद्वारे केली जाणार आहे. वांद्रे पूर्वसारख्या मोक्याच्या ठिकाणी सोडतीसाठी घरे उपलब्ध होणार असल्याने ही बाब दिलासादायक मानली जात आहे.