लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील म्हाडाच्या जागेवरील अनधिकृत जाहिरात फलकांचे सर्वेक्षण सध्या म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून सुरु आहे. यासंबंधीचा अहवाल लवकरच म्हाडा प्राधिकरणाला सादर होण्याची शक्यता आहे. मात्र याआधीच म्हाडा उपाध्यक्षांनी मुंबईतील म्हाडाच्या जागेवरील सर्व अनधिकृत जाहिरात फलक हटविण्याचा निर्णय घेतला आहे. अहवाल सादर झाल्यानंतर तात्काळ फलक हटविण्याच्या कारवाईला सुरुवात केली जाणार आहे.
म्हाडाच्या जागेवरील अनधिकृत जाहिरात फलकांचा प्रश्न सुरुवातीपासूनच गंभीर आहे. त्यामुळेच फेब्रुवारीमध्ये म्हाडाने अनधिकृत जाहिरात फलकांना आळा घालण्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याचा निर्णय घेत त्यादृष्टीने काम सुरु केले होते. अशात घाटकोपर दुर्घटनेनंतर म्हाडाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष वेधले आहे. त्यानुसार घाटकोपर दुर्घटनेच्या दुसर्याच दिवशी म्हाडाने मुंबईतील म्हाडाच्या जागेवरील जाहिरात फलकांच्या सर्वेक्षणाचा निर्णय घेतला. तर यापुढे म्हाडाच्या जागेवरील जाहिरात फलकासाठी संबंधित मंडळाच्या ना हरकत प्रमाणपत्रासह म्हाडा उपाध्यक्षांची मान्यता घेणे बंधनकारक केले आहे. यासंबंधीच्या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी होणार आहे. तर काही दिवसांपूर्वीच जाहिरात फलकाच्या सर्वेक्षणासही सुरुवात झाली आहे.
आणखी वाचा-महापालिकेचे नालेसफाईचे आकडे खोटे, नालेसफाईच्या कामाबाबत श्वेतपत्रिका काढा; आशिष शेलार यांची मागणी
जाहिरात फलकाच्या सर्वेक्षणाचा अहवाल येत्या एक-दोन दिवसांत सादर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर अनधिकृत फलकांवर कारवाई केली जाणार आहे. त्यानुसार सर्व अनधिकृत फलक तात्काळ हटविण्यात येणार असल्याची माहिती म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी लोकसत्ताला दिली. अहवाल सादर झाल्याबरोबर जाहिरात फलक हटविण्याच्या कामास सुरुवात होईल. मोठे जाहिरात फलक हटविण्यासाठी म्हाडाकडे आवश्यक यंत्रणा वा मनुष्यबळ नाही. तेव्हा यंत्रणा आणि मनुष्यबळ मुंबई महानगर पालिकेकडून वा इतर संस्थांकडून उपलब्ध करुन घेत ही कारवाई करण्यात येणार असल्याचेही जयस्वाल यांनी सांगितले.