मुंबई : म्हाडाच्या घरांच्या सोडत प्रक्रियेत पूर्णतः बदल करण्यात आला असून सोडतीसाठी नवीन संगणकीय प्रणालीचा अवलंब करण्यात येणार आहे. इच्छुकांना सोडतपूर्व आणि सोडतीनंतरची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करताना कोणत्याही अडचणी आल्यास त्याचे तात्काळ निवारण करता यावे यासाठी म्हाडा प्राधिकरणाने मदत कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हाडाच्या घरांसाठी एकच नोंदणी गुरुवारपासून सुरू होत आहे. तसेच पुणे मंडळाच्या सोडतीच्या ऑनलाइन अर्जविक्री-स्वीकृतीला ही सुरुवात होणार आहे. म्हाडाचा मदत कक्षामार्फत इच्छुक नोंदणीधारक आणि अर्जदारांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यात येणार आहेत.
हेही वाचा >>> मुंबई महानगरपालिकेच्या सीबीएसई, आंतराष्ट्रीय बोर्डाच्या शाळांची प्रवेश प्रकिया आजपासून
नव्या प्रकियेनुसार आता एकदाच कायमस्वरूपी नोंदणी करण्यात येणार आहे. आता पूर्वीप्रमाणे प्रत्येक सोडतीसाठी वेगवेगळी नोंदणी करावी लागणार नाही. गरजेनुसार फक्त माहितीत बदल करावे लागणार आहेत. पात्रता निश्चितीसाठी आवश्यक ती सात कागदपत्रे नोंदणी करतानाच ऑनलाइन सादर करावी लागणार आहेत. डिजिटल स्वाक्षरी आणि इतर बाबींचाही त्यात समावेश असणार आहे. सोडतीआधीच पात्रता निश्चिती होणार आहे. सोडतीनंतरची ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असणार आहे. एकूणच नवी प्रक्रिया, नवीन संगणकीय प्रणाली हाताळताना इच्छुक नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी म्हाडाने मदत कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच हा कक्ष कार्यान्वित होणार आहे. या कक्षामध्ये नवीन प्रणालीबाबत माहिती आणि मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मदत कक्षाशी दूरध्वनी क्रमांक ०२२ ६९४६८१०० वर संपर्क साधावा.