लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : म्हाडाच्या वांद्रे (पूर्व) येथील मुख्यालयाच्या आवारात मुंबई मंडळ नागरी सुविधा केंद्र उभारत आहे. या नागरी सुविधा केंद्राचे काम अंतिम टप्प्यात आले असून एप्रिलमध्ये हे नागरी सुविधा केंद्र सेवेत दाखल होणार आहे. हे सुविधा केंद्र सुरू झाल्यास नागरिकांना आपली निवेदने, पत्र, तक्रारी वा इतर कागदपत्रे एकाच ठिकाणी जमा करता येणार आहेत. त्यामुळे नागरिकांची पायपीट थांबणार आहे.

दररोज म्हाडा भवनात विविध कामांसाठी मोठ्या संख्येने नागरिक, म्हाडा लाभार्थी विविध कामांसाठीची निवेदने, पत्र, तक्रारी वा इतर कागदपत्रे घेऊन येतात. म्हाडाची अनेक विभागीय मंडळे असून ही कागदपत्रे, निविदने संबंधित नागरिक-लाभार्थ्यांना त्या त्या विभागात जात करावी लागतात. अनेकदा नागरिकांना संबंधित मंडळाचे कार्यालय शोधत फिरावे लागते, कागदपत्रे नेमकी कुठे जमा करायची यासाठी पायपीट करावी लागते.

आपल्या तक्रारींचे, निवेदनाचे वा कामाचे पुढे काय झाले याचा पाठपुरावा करण्यासाठीही सतत म्हाडात फेऱ्या माराव्या लागतात. आता मात्र भवनाची पायरी न चढता कार्यालयाच्या आवारातच एकाच ठिकाणी सर्व विभागीय मंडळाशी संबंधित निवेदने, कागदपत्रे वा तक्रारी, अर्ज जमा करता येणार आहेत.

सुविधा केंद्रासाठी ३६ लाख खर्च

नागरिकांच्या सर्व प्रकारच्या कागदपत्रांची एकाच ठिकाणी स्वीकृती करण्यासाठी मुंबई मंडळ नागरी सुविधा केंद्र बांधत आहे. म्हाडा भवनाच्या आवारात ३६ लाख रुपये खर्च करून हे नागरी सुविधा केंद्र उभारण्यात येत असून सध्या या नागरी सुविधा केंद्राचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

नागरिकांना प्रश्नांची उत्तरे तात्काळ मिळतील

म्हाडा भवनातील प्रवेशद्वार क्रमांक ४ येथे नागरी सुविधा केंद्र उभारण्याच्या कामास अडीच-तीन महिन्यांपूर्वी सुरुवात करण्यात आली होती. नागरी सुविधा केंद्राचे बांधकाम पूर्ण झाले असून आता अंतर्गत कामे सुरू आहेत. ही कामे मार्चअखेरपर्यंत पूर्ण होतील आणि नागरी सुविधा केंद्र सज्ज होईल.

एप्रिलच्या सुरुवातीलाच हे केंद्र नागरिकांच्या सेवेत दाखल करण्याचे नियोजन असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.त्यामुळे आता एप्रिलपासून नागरिकांना आपले टपाल, पत्र, कागदपत्र म्हाडाच्या आवारातील नागरी सुविधा केंद्रात जमा करता येणार आहेत. त्यामुळे नागरिकांची मोठी सोय होणार असून नागरिकांची पायपीट थांबणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या नागरी सुविधा केंद्रात म्हाडाचे कर्मचारी – अधिकारी नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे देतील, त्यांच्या शंकाचे निरसनही करतील.

Story img Loader