मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून गोरेगाव, पहाडी येथे ३५ मजली इमारत बांधण्यात आली असून म्हाडाची ही पहिली उंच आणि पंचतारांकित इमारत आहे. तेथील घरात वास्तव्यास जाण्याचे स्वप्न या घरांसाठीचे ३३२ विजेते पाहात आहेत. त्यांचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असून त्या इमारतीसाठी निवासी दाखला घेण्याच्या प्रक्रियेस अखेर मुंबई मंडळाकडून सुरुवात करण्यात आली आहे. नुकतेच अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी मुंबई मंडळाने अग्निशमन दलाकडे प्रस्ताव सादर केला असून तो मंजूर झाल्यानंतर म्हाडा प्राधिकरणाकडून इमारतीस निवासी दाखला देण्यात येईल आणि घरांचा ताबा देण्याचा मार्ग मोकळा होईल. एप्रिलपासून ताबा देण्याच्या प्रक्रियेस सुरुवात होईल.

पहाडी गोरेगाव येथे अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च अशा सर्व गटांसाठी मुंबई मंडळाकडून गृहनिर्मिती करण्यात आली आहे. अत्यल्प आणि अल्प गटातील घरांसाठी २०२३ मध्ये सोडत काढून घरांचा ताबा देण्यात आला आहे. मध्यम आणि उच्च गटासाठी तेथे ३३२ घरे बांधण्याचे काम सुरु होते. ते नुकतेच पूर्ण झाले. दरम्यान या ३३२ घरांसाठी निर्माणाधीन प्रकल्पाअंतर्गत २०२४ मध्ये मंडळाने सोडत काढली आहे. सोडत काढतानाच मंडळाने मार्च २०२४ पर्यंत घरांचा ताबा दिला जाईल असे आश्वासन विजेत्यांना दिले. मात्र त्यास काहीसा विलंब झाला आहे. पण इमारतीचे काम पूर्ण करून आता मंडळाने ३५ मजली इमारतीसाठी निवासी दाखला घेण्याच्या प्रक्रियेस सुरुवात केली आहे. मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱयाने दिलेल्या माहितीनुसार नुकताच अग्निशमन दलाच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी मंडळाने प्रस्ताव सादर केला आहे. तो मान्य झाल्यास म्हाडा प्राधिकरणाकडे निवासी दाखल्यासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात येईल. आता म्हाडाला नियोजन प्राधिकरणाचा दर्जा प्राप्त झाल्याने म्हाडाच्या इमारतीस म्हाडा प्राधिकरणाकडूनच निवासी दाखला मिळत असल्याने निवासी दाखल्याची प्रक्रिया वेगवान झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच निवासी दाखला मिळेल आणि एप्रिलपासून ३३२ विजेत्यांना ताबा देण्याच्या प्रक्रियेस सुरुवात होईल, असेही अधिकार्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ३३२ विजेत्यांची हक्काच्या घरात राहायला जाण्याची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे.

पहाडीतील ३५ मजली इमारतीतील १०५ घरे उच्च गटासाठी १०५ तर २२७ घरे मध्यम गटासाठी आहेत. १०५ घरांचे क्षेत्रफळ ९८९.५८ चौ. फुट असे आहे तर २२७ घरांचे क्षेत्रफळ ७९४.३१ चौ. फूट असे आहे उच्च गटातील घरे हि ३ बीएचकेची तर मध्यम गटातील घरे हि २ बीएचकेची आहेत.या प्रकल्पात जलतरण तलाव, व्यायामशाळा, योगा केंद्र, पोडीयम वाहनतळ, क्लब हाऊस अशा पंचतारांकीत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे म्हाडाच्या प्रकल्पात पहिल्यांदाच अशा पंचतारांकित, अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे म्हाडाची आतापर्यंतची ही सर्वात उंच आणि खासगी विकासकांप्रमाणे पंचतारांकित सुविधा असलेला असा हा पहिला प्रकल्प आहे. या प्रकल्पातील उच्च गटाच्या घरासाठी मंडळाने १ कोटी ३३ लाख ७७ हजार ५५८ रुपये अशी किंमत सोडतीत आकारली आहे. तर मध्यम गटाच्या घरासाठी १ कोटी ९ लाख ते १ कोटी ११ लाखांदरम्यान किंमती आकारली आहे.

Story img Loader