मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाने ठाण्यात नोकरदार महिलांसाठी एक वसतिगृह आणि एक वृद्धाश्रम बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार माजीवडा येथील विवेकानंद नगर अभिन्यासातील (लेआऊट) दोन स्वतंत्र भूखंडांवर सात मजली वृद्धाश्रम आणि सात मजली वसतिगृह बांधण्यात येणार असून त्यासाठी आठवड्याभरात कोकण मंडळाकडून निविदा मागविल्या जाणार आहेत. नीती आयोगाच्या शिफराशीनुसार मुंबई महानगर प्रदेशाचा (एमएमआर) विकास ग्रोथ हब म्हणून केला जात आहे. या ग्रोथ हबच्या आराखड्यानुसार एमएमआरमध्ये २०३० पर्यंत आठ लाख घरांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
महिला, वृद्ध, विद्यार्थी, मजूर अशा घटकांनाही हक्काचा निवारा देण्याच्यासाठी प्रकल्प राबविण्याची शिफारस आराखड्यात करण्यात आली आहे. त्यानुसार म्हाडाने मुंबई आणि ठाण्यात नोकरदार महिलांसाठी, शालेय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत या पूर्वीच म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून काळाचौकीतील जिजामाता नगर येथे १८ मजली विद्यार्थी वसतिगृह बांधण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. लवकरच म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून ताडदेव येथे नोकरदार महिलांसाठी २३ मजली वसतिगृह बांधण्याच्या कामास सुरुवात होणार आहे. त्याचवेळी महिला वसतिगृहाची संख्या वाढविण्यासाठी मुंबई मंडळाकडून जागेचा शोध सुरु आहे. वृद्धाश्रमासाठीही जागा शोधली जात आहे.
दुसरीकडे कोकण मंडळानेही ठाण्यात नोकरदार महिलांसाठी वसतिगृह आणि वृद्धाश्रम बांधण्यासाठी जागेचा शोध सुरु केला होता. त्यानुसार आता दोन भूखंड मंडळाने निश्चित केले आहेत. ठाण्यातील माजीवाडा येथील मंडळाच्या विवेकानंद नगर अभिन्यासातील भूखंडावर एक वृद्धाश्रम आणि एक नोकरदार महिलांसाठी वसतिगृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कोकण मंडळातील अधिकाऱयांनी सांगितले.
विवेकानंद नगर येथील अंदाजे १३०० चौ. मीटर जागेवर वृद्धाश्रम बांधण्यात येणार असून वृद्धाश्रमाची इमारत सात मजल्यांची असणार आहे. तर विवेकानंद नगर येथेच अंदाजे १५०० चौ.मीटर जागेवर सात मजली नोकरदार महिलांसाठी वसतिगृह बांधण्यात येणार आहे. या दोन्ही इमारतीत अंदाजे १०० खोल्या असतील. वृद्धांसाठी तसेच महिलांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधांचा समावेश तेथे असेल, असे अधिकार्यांनी सांगितले. वृद्धाश्रमासाठी ११ कोटी रुपये तर महिला वसतिगृहासाठी ११ कोटी रुपये असा खर्च अपेक्षित असून त्याला मान्यताही मिळाली आहे. दोन्ही इमारतींच्या प्रत्यक्ष बांधकामासाठी निविदा काढण्याची तयारीही पूर्ण झाली आहे. आठवड्याभरात वृद्धाश्रम आणि महिला वसतिगृहाच्या बांधकामासाठी निविदा प्रसिद्ध केल्या जाणार असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. निविदा प्रक्रिया शक्य तितक्या लवकर पूर्ण करून इमारतींच्या प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात करण्याचे कोकण मंडळाचे नियोजन आहे. त्यामुळे येत्या काही वर्षातच ठाणे आणि आसपास नोकरीच्या निमित्ताने राज्यासह देशाच्या कानाकोपर्यातून ठाणे, मुंबईत येणाऱ.ा महिलांसाठी निवाऱयाचा एक पर्याय उपलब्ध होणार आहे.