मुंबई : प्रेयसीच्या डोक्यात लोखंडी सळीने प्रहार करून हत्या केल्याच्या आरोपाखाली एमएचबी पोलिसांनी २४ तासांमध्ये २४ वर्षीय तरूणाला अटक केली. आरोपीने ३१ जुलै रोजी केलेल्या हल्ल्यात महिलेला गंभीर दुखापत झाली होती. केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान रविवारी तिचा मृत्यू झाला.
चुनीयादेवी यादव असे मृत महिलेचे नाव आहे. पूर्वी चुनीयादेवी पतीसोबत दहिसरमध्ये राहात होती. उभयतांमध्ये वाद झाल्यामुळे ते विभक्त झाले आणि ती तिचा प्रियकर राजीव साह याच्यासोबत बोरिवलीतील गणपत पाटील नगर येथे राहू लागली. जुनीयादेवी आणि साहमध्ये ३१ जुलै रोजी वाद झाला आणि रागाच्या भरात साहने लोखंडी सळीने तिच्या डोक्यात प्रहार केला. त्यानंतर महिला गरम भांड्यावर पडली आणि ती भाजली. या घटनेनंतर साह तेथून पळून गेला. शेजाऱ्यांनी तिला जवळच्या रुग्णालयात नेले आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली. चुनीयादेवीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला केईएम रुग्णालयात हलविण्यात आले.
हेही वाचा…मुंबई : झोपु प्राधिकरण घटनास्थळी जाऊन थकित भाड्याचा आढावा घेणार! प्रमाणित लेखापरीक्षकांची नियुक्ती
एमएचबी पोलिसांनी याप्रकरणात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला होता. उपचारादरम्यान चुनीयादेवीचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी हत्येच्या गुन्हा दाखल केला. वरिष्ठ अधिकारी सुधीर कुडाळकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन गुन्हे प्रकटीकरण पथकास तपासासंबंधी सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप गोरडे व पथकाने साहबद्दल परिसरातून माहिती मिळविली. तसेच त्याचे छायाचित्र, मोबाइल क्रमांकही मिळवला. आरोपीने हैदराबादमध्ये अनेक दूरध्वनी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी संबंधित व्यक्तीकडून माहिती घेतली असता आरोपी हैदराबादला पळून गेल्याचे समजले. त्यानुसार पोलीस पथक खासगी वाहनाने हैदराबादला रवाना झाले. सलग १५ तास प्रवास करून हैदराबादमधील कोमपल्ली परिसराती मोठ्या औद्यागिक परिसरात आरोपीचा शोध घेण्यात आला. त्यानंतर सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. साहला मुंबईत आणून अटक करण्यात आली.