लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : अभियांत्रिकी, कृषी आणि औषधनिर्माणशास्त्र या अभ्यासक्रमासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या आणि राज्यातील सर्वात मोठी प्रवेश परीक्षा समजल्या जाणाऱ्या ‘एमएचटी – सीईटी’ला बुधवार, ९ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. ‘पीसीबी’ गटाची परीक्षा पहिल्या टप्प्यात होत असून, यासाठी ३ लाख १ हजार ७२३ अर्ज आले आहेत. ही परीक्षा १८१ केंद्रांवर होणार असून यापैकी नऊ केंद्र ही राज्याबाहेर आहेत.

एमएचटी-सीईटी ही दोन टप्प्यात होणार असून, पहिला टप्पा ९ ते १७ एप्रिलदरम्यान होणार आहे. पहिल्या टप्प्यात कृषी आणि औषधनिर्माणशास्त्र या अभ्यासक्रमासाठी परीक्षा होणार आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र म्हणजेच ‘पीसीबी’ गटासाठी देशभरातून ३ लाख १ हजार ७२३ अर्ज आले आहेत. दुसऱ्या टप्प्यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित म्हणजेच ‘पीसीएम’ या गटासाठी १९ ते २७ एप्रिल दरम्यान परीक्षा होणार आहे. पीसीएम गटासाठी ४ लाख ६४ हजार २६३ विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली आहे. ही परीक्षा १८१ केंद्रांवर होणार असून १७२ केंद्र राज्यात आणि नऊ केंद्र राज्याबाहेर आहेत.

गैरप्रकार रोखण्यासाठी सीईटी कक्ष सज्ज, पर्यवेक्षकांच्या अंगावर कॅमेरे

एमएचटी-सीईटीदरम्यान गैरप्रकार होऊ नये, यासाठी यंदा परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबरोबरच पर्यवेक्षकांच्या अंगावरही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे केंद्रावर होणाऱ्या सर्व घडोमोडींवर बारीक नजर ठेवता येणार आहे. तर पर्यवेक्षकांच्या अंगावरील कॅमेऱ्यामुळे परीक्षा सुरू असताना प्रत्येक विद्यार्थ्यावर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. पर्यवेक्षकांच्या शरीराच्या पुढील बाजूला हा कॅमेरा लावण्यात येणार असल्याने पर्यवेक्षकाच्या नजरेतून एखादी गोष्ट सुटली तरी ती कॅमेऱ्यामध्ये कैद होण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्याची होणार पडताळणी

सीसीटीव्ही व अंगावरील कॅमेऱ्यांबरोबरच बोगस विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी परीक्षा केंद्रावर प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्याची पडताळणी होणार आहे. ही पडताळणी करताना विद्यार्थ्यांनी अर्ज करताना दिलेले छायाचित्र आणि चेहरा यामध्ये ८० टक्के साम्य असणे आवश्यक असणार आहे. साम्य आढळल्यानंतरच विद्यार्थ्याला प्रवेश केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

चेहरा पडताळणीदरम्यान विद्यार्थ्यांचा घेण्यात आलेला तपशील जतन करून ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थी प्रवेशासाठी येईल त्यावेळी त्याने सादर केलेले छायाचित्र, त्याच्या अर्जावरील छायाचित्र आणि परीक्षेदरम्यानच्या चेहरा पडताळणीवेळीचा चेहरा यांचे तपशील जुळवण्यात येणार आहे. यामुळे परीक्षेतील गैरप्रकार रोखण्याबरोबरच परीक्षा अधिक पादर्शकपणे पार पडण्यास मदत होणार आहे. तसेच भविष्यात आणखी नव्या तंत्रज्ञानाचा समावेश करून परीक्षेवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातील सूत्राकडून सांगण्यात आले.