लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषि अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी-सीईटी) निकाल राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) आज सोमवारी सकाळी ११ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला. त्यानुसार भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित (पीसीएम) गटात १४ विद्यार्थ्यांनी आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र (पीसीबी) गटात १४ विद्यार्थ्यांनी शंभर पर्सेटाईल मिळवले.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) विविध पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या सीईटी घेतल्या जातात. राज्य सीईटी सेलमार्फत ही परीक्षा ३६ जिल्ह्यांच्या ठिकाणी १९७ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. यापैकी १८१ केंद्रे ही महाराष्ट्रात आणि १६ केंद्रे ही महाराष्ट्राच्या बाहेर होती.
आणखी वाचा-मुंबई: आज दुपारी १ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणी करता येणार
पीसीएम गटातून ३ लाख १३ हजार ७३०, तर पीसीबी गटातून २ लाख ७७ हजार ४०० अशा एकूण ५ लाख ९१ हजार १३० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ९२.९३ टक्के इतकी विद्यार्थ्यांच्या हजेरीची टक्केवारी आहे. आतापर्यंत सव्वा दोन लाख विद्यार्थ्यांनी कोणत्याही तांत्रिक अडथळ्याविना स्वतःच्या गुणपत्रिका ऑनलाइन प्राप्त केल्या आहेत. राखीव गटातून पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांची यादी सीईटी सेलच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. http://www.mahacet.org आणि http://www.mahacet.in या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.