मुंबई : राज्यातील शासकीय कामांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येत असून डिजिटल प्रशासन आणि सेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र हे देशात सर्वोत्कृष्ट उदाहरण ठरावे, यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाऊंडेशनकडून सहकार्य करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महिला स्वयंरोजगाराच्या २५ लाख ‘लखपती दिदीं’च्या उद्दिष्टपूर्तीसाठी या उपक्रमात सहभाग घेऊन महिलांना उद्याोजक बनविण्यात गेट्स फाऊंडेशनने भागीदारी घेण्याची तयारी दर्शविली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक, प्रख्यात उद्याोजक आणि गेट्स फाऊंडेशनचे बिल गेट्स यांच्यात यासंदर्भात गुरुवारी चर्चा झाली.

बिल गेट्स आणि फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर सदिच्छा भेट घेतली. यावेळी आरोग्य, कृषी आणि पायाभूत सुविधांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत त्यांच्यात चर्चा झाली. यावेळी फडणवीस म्हणाले की, राज्यात परिवर्तन होत असून पायाभूत सुविधा, कृषी, आरोग्य क्षेत्रात मोठे प्रकल्प सुरू आहेत. ग्रामीण भागात डॉक्टरांची कमतरता असल्याने दर्जेदार आरोग्य सेवा-सुविधा देण्यासाठी गेट्स फाऊंडेशने सहकार्य करावे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर आरोग्य आणि कृषी क्षेत्रामध्ये करण्यासाठी अर्थसंकल्पातही तरतूद केली आहे. पुणे जिल्ह्यात एआयच्या वापरातून ऊसाचे दुप्पट उत्पादन घेतल्याचे उदाहरणही मुख्यमंत्र्यांनी दिले. नवी मुंबई येथे ३०० एकर परिसरात नाविन्यता शहर विकसित करण्यात येत असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी गेट्स यांना दिली. गेटस यांनी इनोव्हेशन सिटी आणि इतर उपक्रमासाठी आर्थिक बाबींसह तांत्रिक मदतीत सहभाग घेण्याची ग्वाही दिली.

शाश्वत ऊर्जेसाठी भागीदारी

राज्यात विविध सामाजिक संस्था, व कंपन्यांच्या सहकार्याने शाश्वत ऊर्जेसाठी भागीदारी करण्यात येणार असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. महाराष्ट्राची क्षमता मोठी असल्याने राज्याच्या विकासाचे उदाहरण जगभर नेण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही गेट्स यांनी दिली.

मलेरियामुक्त महाराष्ट्रासाठी प्रयत्न

राज्यात डासांमुळे मलेरियाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मलेरियामुक्त महाराष्ट्र करण्यासह डेंग्यू नियंत्रणासाठी गेट्स फाऊंडेशन प्रयत्नशील आहे. यासाठीही तांत्रिक, आर्थिक मदत करण्यात येणार असून गडचिरोली जिल्ह्यापासून याची सुरुवात करण्यात येणार असल्याचे गेट्स यांनी सांगितले. दूध उत्पादन वाढीसाठी तंत्रज्ञानाचा वापर, गरीब कुटुंबांसाठी ग्रामीण जीवनोन्नती अभियान, महिला सबलीकरण आणि स्वयंरोजगारासाठी २५ लाख महिला लखपती दीदी, लाडकी बहीण योजना आदी उपक्रमांमध्ये मायक्रोसॉफ्ट व गेट्स फाऊंडेशन सहकार्य करणार आहे.