औद्योगिक विकासाची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आता थेट वीजनिर्मितीचा प्रकल्प हाती घेतला आहे. विदर्भात चंद्रपूर जिल्ह्यात १३२० मेगावॉटचा वीजप्रकल्प उभारण्याचा निर्णय महामंडळाने घेतला असून ‘बांधा-चालवा आणि हस्तांतरित करा’ तत्त्वावर उभारण्यात येणाऱ्या या वीजप्रकल्पासाठी महामंडळाने इच्छुकांकडून निविदा मागवल्या आहेत.‘एमआयडीसी’कडे चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती येथे जवळपास १३०० एकर जागा आहे. जागा ताब्यात असल्याने भूसंपादन, पुनर्वसन असे प्रश्न नाहीत. या जागेवर ६६० मेगावॉट क्षमतेचे दोन संच अशारितीने १३२० मेगावॉट क्षमतेचा वीजप्रकल्प उभारण्याचा ‘एमआयडीसी’चा विचार आहे. जागा ‘एमआयडीसी’ची आणि वीजप्रकल्प खासगी कंपनीचा अशारितीने हा प्रकल्प उभारला जाऊ शकतो. खासगी कंपनीने वीजप्रकल्प उभारावा, चालवावा आणि नंतर हस्तांतरित करावा, (बिल्ट-ओन-ऑपरेट-ट्रान्सफर अर्थात ‘बूट’) या तत्त्वावर हा वीजप्रकल्प उभारण्याचे नियोजन असून त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
वीजप्रकल्प उभारण्यापोटी चांगली रक्कम वा माफक दरात वीज देण्याच्या मोबदल्यात या वीजप्रकल्पाचे काम संबंधित कंपनीला मिळेल. राज्याची विजेची गरज भागवण्यासाठी ‘महानिर्मिती’चे वीजप्रकल्प अपुरे पडत आहेत. खासगी क्षेत्राचे वीजप्रकल्पही मोठय़ाप्रमाणात येत आहेत. अशा वातावरणात थेट ‘एमआयडीसी’ने वीजप्रकल्पासाठी निविदा काढल्याने वीजकंपन्याही चकित झाल्या आहेत.

Story img Loader