जगभरातील बहुतेक विधायक कामे आणि चळवळी मध्यमवर्गीयांनीच केल्या. भारतीय स्वातंत्र्य लढय़ाच्या इतिहासावर दृष्टिक्षेप टाकल्यास त्यातही कनिष्ठ मध्यमवर्गीयांचाच अधिक भरणा असल्याचे दिसून येते. दुर्दैवाने स्वातंत्रोत्तर काळात मध्यमवर्ग आत्ममग्न आणि राजकीय व्यवस्थेविषयी उदासीन राहिला. परिणामी राजकारणाची अधोगती झाली. सदैव चांगल्याची काम धरणारा मध्यमवर्गीय समाज जास्तीत जास्त संख्येने राजकारणात सक्रीय झाला, तर भारताचा भविष्यकाळ उज्ज्वल असेल, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी गुरूवारी येथे केले.
येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात ‘इंद्रधनु’ संस्थेच्या वार्षिक रंगोत्सवाचे उद्घाटन पर्रिकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ‘भारताची भविष्यातील जडण घडण’ या विषयावरील मुक्त चिंतनात त्यांनी उपभोक्ता केंद्रीत अमेरिकन संस्कृतीवर टीका केली. आपले प्रज्ञावंत करिअर घडविण्यासाठी परदेशात जातात आणि आपण तिकडचे तयार उत्पादन आयात करतो. राजकारणी काही बाहेरून येत नाहीत. समाजातील बऱ्या-वाईटांचे प्रतिबिंबच राजकारणातून उमटते. त्यामुळे उडदामाजी काळे गोरे हे असणारच, पण तरीही भारतीय जनता पक्ष भ्रष्ट्राचारी व्यक्तींना फारसा थारा देत नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला. उद्योजक श्रीकांत बापट तसेच संस्थेचे अध्यक्ष अजित परांजपे उपस्थित होते.
गेल्या २५ वर्षांतील सांस्कृतिक ऋणानुबंधातील काही निवडक संस्मरणीय कार्यक्रम इंद्रधनु संस्थेने डीव्हीडी स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून त्याच्या पहिल्या दोन डीव्हीडी संचाचे प्रकाशनही या समारंभात करण्यात आले. पं.भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, श्रीधर फडके, सुरेश वाडकर, अशोक पत्की आदींच्या संगीत मैफिलींचा या स्मरणगाथेत समावेश आहे.
लोकसत्ताच्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ चे कौतुक
संस्थेतर्फे यंदा मेळघाट परिसरात संपूर्ण बांबू केंद्राद्वारे स्थानिक आदिवासी समाजास सक्षम करण्यास हातभार लावणाऱ्या सुनील आणि डॉ, निरूपमा या देशपांडे दाम्पत्याचा पर्रिकर यांच्या हस्ते युवोन्मेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना सुनील देशपांडे यांनी यंदा गणेशोत्सवात दै. लोकसत्ताने राबविलेल्या सर्वकार्येषु सर्वदा उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमाने आर्थिक मदतीबरोबरच अनेक नवे मित्र दिले, असेही त्यांनी कृतज्ञतापूर्वक नमूद केले. त्याचप्रमाणे पीतांबरीचे रवींद्र प्रभुदेसाई आणि ‘टीप-टॉप’चे रोहित शहा यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.