मराठी मनोरंजनसृष्टीचा डंका सातासमुद्रापार वाजवणाऱ्या ‘मिफ्ता’ (मराठी इंटरनॅशनल फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन अ‍ॅवॉर्ड्स) या पुरस्कार सोहळ्याला नवसंजीवनी मिळाली असून या सोहळ्याचे नावही बदलले आहे. आता ‘मिक्ता’ (मराठी इंटरनॅशनल सिनेमा अ‍ॅण्ड टेलिव्हिजन अ‍ॅवॉर्ड्स) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याला आता महाराष्ट्राचे उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या मुलाचे, नितेश राणे यांचे भक्कम पाठबळ लाभले आहे. त्यामुळे आतापर्यंत केवळ राजेशाही थाटात विविध देशांमध्ये पार पडलेला हा पुरस्कार सोहळा यंदा ‘राणे’शाही थाटात स्वित्र्झलड येथे पार पडणार आहे.
गेल्या वर्षी सिंगापूर येथे पार पडलेल्या ‘मिफ्ता’ पुरस्कार सोहळ्यात महेश मांजरेकर यांनी आता आपल्याला ही जबाबदारी सांभाळणे कठीण होत असून कोणीतरी तरुण कलाकाराने पुढे यावे, असे भावनिक आवाहन केले होते. या आवाहनानंतर पुढील वर्षी ‘मिफ्ता’चा झेंडा युरोपमध्ये फडकवण्याची मनिषाही त्यांनी बोलून दाखवली होती. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘मिफ्ता’चा आर्थिक डोलारा सांभाळणे दिवसेंदिवस कठीण होऊ लागले होते. त्यामुळे या सोहळ्याचे काय करायचे, हा प्रश्न आयोजकांसमोर होता.
दरम्यान, महेश मांजरेकर यांनी केलेल्या आवाहनाला अभिनेता सुशांत शेलार याने सकारात्मक प्रतिसाद दिला. सुशांतच्या मध्यस्थीने नितेश राणे यांच्या महाराष्ट्र कलानिधी या संस्थेशी संपर्क साधण्यात आला. ‘मिफ्ता’ला अधिक भव्यदिव्य करण्याचा विचार केला, त्या वेळी आपल्या डोळ्यांसमोर आपल्याला भावाप्रमाणे असलेल्या नितेश राणे यांचेच नाव आले. त्यांनीही लगेचच होकार दिल्याचे सुशांतने ‘मिक्ता’ या नवीन नावाच्या घोषणा सोहळ्यात सांगितले.

Story img Loader