शुक्रवारी संध्याकाळी मुंबईतलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. एकीकडे महायुतीची सर्व नेतेमंडळी प्रचारसभेच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आली होती. त्यांच्यासमवेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेही होते. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या सभेच्या निमित्ताने त्यांचे नेतेही एकत्र आले होते. या पार्श्वभूमीवर ईशान्य मुंबईचे महायुतीकडून निवडणूक लढवणारे भाजपाचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयासमोर झालेला राडा चर्चेत आला. त्यांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला असून तो ठाकरे गटाकडून झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षानं केला आहे. या पार्श्वभूमीवर आता मिहीर कोटेचांनी ठाकरे गटाला थेट आव्हान दिलं आहे.
नेमकं काय घडलं कोटेचांच्या कार्यालयाबाहेर?
शुक्रवारी एकीकडे महायुती व महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींच्या मुंबईत सभा चालू असताना दुसरीकडे मिहीर कोटेचा यांच्या मुलुंडमधील कार्यालयात मोठा राडा सुरू झाला. त्यांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आल्याचा दावा भाजपानं केला आहे. यानंतर कार्यालयासमोर भारतीय जनता पक्ष व ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जमा झाले होते.
हा प्रकार घडल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नेते प्रसाद लाड यांनी घटनास्थळी भेट दिली. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही घडलेल्या प्रकाराचा आढावा घेतला. यानंतर प्रसाद लाड यांनी भ्याड हल्ला म्हणत या घटनेचा निषेध केला. “संजय पाटलांना पराभव दिसू लागल्यामुळे असे हल्ले होत आहेत”, असा आरोपही त्यांनी केला. त्यापाठोपाठ आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं. “कोटेचांचे कार्यकर्ते कार्यालयात पैसे वाटत होते. त्याचा व्हिडीओही समोर आला आहे. पोलिसांना बोलावल्यानंतर त्यांनी ठाकरे गटाच्याच कार्यकर्त्यांना अटक केली”, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला.
मिहीर कोटेचांचं प्रत्युत्तर
दरम्यान, या राड्याप्रकरणी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना मिहीर कोटेचा यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “मानखुर्दचे नवाब संजय दीना पाटील…आज पंतप्रधानांच्या सभेसाठी आम्ही सगळे शिवाजी पार्कला निघाल्यानंतर तुमचे गुंड मुश्ताक खान आणि इतरांनी माझ्या वॉररूमवर भेकड हल्ला केला. माझ्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. आज मी शपथ घेतो. निवडून आल्यानंतर तुमचे सगळे काळे धंदे, ड्रग्ज, मटका, गुटखा हे बंद करणारच. मानखुर्दचं नाव छत्रपती शिवाजी महाराज नगर करणारच”, असं मिहीर कोटेचा म्हणाले.
मिहीर कोटेचा यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यासोबत “मुंबईकरांना आता ठरवायची वेळ आलीये की लोकसभेच्या गेटबाहेर गुटखा विकणारा खासदार पाठवायचा की तुमचा सेवक पाठवायचा”, असा शेराही त्यांनी पोस्टमध्ये मारला आहे.