मुंबईतील २१०४ पर्जन्यवृक्षांना ‘मिलिबग’ या कीटकाची लागण झाली आहे आणि आतापर्यंत ११०८ झाडे त्यामुळे मेली आहेत, अशी माहिती पालिकेने उच्च न्यायालयात दिली आहे. ‘मिलिबग’मुळे मुंबईतील झपाटय़ाने मरत असलेल्या झाडांना वाचवण्यासाठी काय उपायोजना केल्या जात आहेत, अशी विचारणा करताना त्यासाठी तातडीने पावले उचला, असे निर्देश न्यायालयाने पालिकेला दिले.
खार ते सांताक्रूझ (पश्चिम) विभागातील अंदाजे ११६ झाडे ही ‘मिलिबग’ या कीटकांमुळे मरणपंथाला आहेत. त्यामुळे त्यापासून झाडांना वाचविण्यासाठी पालिकेला आदेश देण्याची मागणी जनहित याचिकेद्वारे करण्यात आली आहे. झोरू मथेना यांनी ही याचिका केली असून न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आणि न्यायमूर्ती रेवती ढेरे यांच्या खंडपीठासमोर त्यावर नुकतीच सुनावणी झाली. त्या वेळेस पालिकेच्या वतीने अ‍ॅड्. तृप्ती पुराणिक यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. न्यायालयाने याचिकेवरील सुनावणी जानेवारीमध्ये ठेवली आहे.
दरम्यान, या प्रतिज्ञापत्रात, २०१० पासून २१०४ झाडांना ‘मिलिबग’ या कीटकाची लागण झाली आहे आणि आतापर्यंत ११०८ झाडे त्यामुळे मृत झाल्याचे पालिकेने म्हटले आहे. मात्र मृत झाडांच्या जागी १५४६ झाडे रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आली आहे, असा दावाही पालिकेने केला आहे. ही पर्जन्यवृक्ष मूळची अमेरिकेतील आहेत आणि ४० ते ५० वर्षे जुनी आहेत. ‘मिलिबग’चा बहुतांश झाडांना प्रादुर्भाव झालेला आहे; परंतु जैविक खताद्वारे प्रादुर्भाव झालेल्या झाडांना वाचवण्याचा तसेच स्वदेशी उंच झाडे लावून मुंबईतील हरितपट्टा कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा दावाही पालिकेने केला आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील कालिना ते बोरिवली या पट्टय़ातील १०० झाडांना या कीटकाची लागण झाली आहे. त्यामुळे एकूण मुंबईतील हा आकडा अधिक असू शकतो.

Story img Loader