Aaditya Thackeray Vs Milind Deora In Worli Assembly Constituency: वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवेसना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. यावेळी त्यांना वरळी विधानसभेतून कडवे आव्हान मिळणार आहे. २०१९ साली त्यांनी जेव्हा पहिल्यांदा निवडणूक लढविली होती, तेव्हा मनसेने त्यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सचिन अहिर यांना शिवसेनेत घेण्यात आले होते. तसेच वरळीचे स्थानिक नेते शिंदे यांना विधानपरिषदेवर घेण्यात आले होते. शिवसेना-भाजपाची युती असल्यामुळे आदित्य ठाकरेंसाठी पहिली निवडणूक तुलनेने सोपी गेली होती. मात्र यावेळी मनसेकडून संदीप देशपांडे आणि आता शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाकडून मिलिंद देवरा यांचे तगडे आव्हान आदित्य ठाकरेंच्या विरोधात उभे ठाकले आहे.

मिलिंद देवरा यांनी एक्सवर पोस्ट करून उमेदवारीबाबत माहिती दिली आहे. वरळीकरांना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला निवडणुकीला उभे राहण्याची सूचना दिली आहे. आम्ही एकत्रपणे वरळी आणि वरळीकरांना न्याय देऊ. वरळीच्या विकासाचे उद्दिष्ट काही वेळातच जाहीर करू. आता वरळीची वेळ आहे, अशा आशयाचे कॅप्शन मिलिंद देवरा यांनी लिहिले आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी जानेवारी महिन्यात मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा हात सोडून शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले होते. ते दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवतील अशी शक्यता वाटत होती. मात्र त्याआधीच त्यांची वर्णी राज्यसभेवर लागली.

हे वाचा >> Worli Assembly constituency : बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंसाठी अवघड पेपर? महायुतीकडून सुरंग लावण्याचा प्रयत्न, मनसे व शिंदेंनी समीकरणं बदलली

मिलिंद देवरा यांनी २००४ आणि २००९ साली दक्षिण मुंबई लोकसभेतून काँग्रेसच्या तिकीटावर विजय मिळविला होता; तर २०१४ आणि २०१९ साली त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना केंद्रातही मंत्रिपद देण्यात आले होते. तसेच त्यांचे वडील मुरली देवरा हे चार वेळा दक्षिण मुंबईतून खासदार झाले होते. वरळी विधानसभा हा दक्षिण मुंबई लोकसभेअंतर्गतच येतो. त्यामुळे या मतदारसंघात देवरा यांना माननारा एक वर्ग आहे. तसेच अमराठी मतांवर त्यांची पकड आहे.

वरळीत जय शाहांनाच उभे करा

वरळी विधानसभेत शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्याची चर्चा असताना संजय राऊत सकाळी म्हणाले की, मिलिंद देवरा यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांनी स्वतः आदित्य ठाकरेंच्या विरोधात उभे राहावे किंवा दिल्लीतून उमेदवारा आणावा. एवढीच महत्त्वाची जागा असेल तर थेट जय शाहांनाच उभे करावे.