मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) निवडणुकीमध्ये गुरुवारी शरद पवार-आशीष शेलार पवार गटाने बाजी मारली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अशी ओळख असलेल्या अमोल काळे यांची अध्यक्षपदी निवड झाली. कार्यकारिणी परिषद सदस्यपदी उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे सर्वाधिक गुणांनी निवडून आले आहेत. राजकीय आखाड्यात परस्परांविरोधात लढणाऱ्या पक्षांमधील नेते मंडळी क्रिकेटच्या निवडणुकीमध्ये युतीमध्ये दिसून आल्याने आधीच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. असं असतानाच विजयानंतर मिलिंद नार्वेकरांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या निवडणुकीच्या मतदानासाठी न आल्यासंदर्भात प्रतिक्रिया नोंदवली आहे.
नक्की वाचा >> “शरद पवार २०२४ च्या निवडणुकीमध्ये मोदींना साथ देतील असा विश्वास वाटतो”; मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याचं विधान
कार्यकारिणी परिषद सदस्यपदाच्या नऊ जागांसाठी २३ उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये मिलिंद नार्वेकर यांना सर्वाधिक म्हणजे २२१ गुण मिळाले. नार्वेकर पहिल्यांदाच एमसीएच्या कार्यकारणीमध्ये सहभागी होणार आहेत. निवडून आल्यानंतर ‘मुंबई तक’ला नार्वेकरांनी विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये नार्वेकरांना ठाकरे कुटुंबातील एकाही सदस्याने मतदानासाठी हजेरी लावली नाही यासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला. ठाकरे कुटुंबाची तीन मतं मिळाली असती तर तुम्ही अधिक गुणांनी जिंकला असता अशा अर्थाने नार्वेकरांना प्रश्न विचारण्यात आला होता.
“अशी चर्चा होती की तिन्ही ठाकरे मतदानाला आले नाहीत. तुमची तीन मतं अजून वाढली असती. तुम्ही नंबर वनवर होता. अजून तीन मतांनी नंबर वन वर असता. ते मतदानाला का नाही येऊ शकले? तुम्हाला ठाऊक असेलच,” असं म्हणत पत्रकाराने प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना नार्वेकरांनी, “ते नाही आले तरी हरकत नाही. उमेदवारी दिली म्हणून २२१ पर्यंत पोहोचलेलो आहे हे फार महत्त्वाचं आहे,” असं म्हटलं.
नक्की वाचा >> ‘मी, फडणवीस, पवार एकत्र असल्यानं काही जणांची…”; पवार अन् फडणवीसांच्या मध्ये उभं राहून भाषण देताना CM शिंदेंचा ठाकरेंना टोला
शिवसेनेतील फूट आणि शिंदे गट बाहेर पडल्यानंतरची ही पहिली निवडणूक होती. राजकीय आखाड्यामध्ये एकमेकांविरोधात लढणारे क्रिकेटच्या मैदानात एकमेकांना खांदा लावून लढत आहेत अशी सर्वसामान्यांकडून टीका होत आहे यावर काय सांगाल? असा प्रश्न पत्रकाराने नार्वेकरांना विचारला. पत्रकाराच्या या गुगलीवर नार्वेकरांनी, “यावर पवारसाहेब बोलतील” असं उत्तर दिलं.