मध्यपूर्वेच्या गाझापट्टीत पॅलेस्टाइनवर इस्रायलकडून होत असलेल्या बाँबहल्ल्यांचा बदला घेण्यासाठी मुंबईत दहशतवादी हल्ले घडवून आणण्याची धमकी देणारे पत्र पोलीस आयुक्तांना मिळाल्यानंतर शहरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
एका पानाचे हे धमकीपत्र मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला शुक्रवारी टपालाने मिळाले. ‘आम्ही गाझातील घटनांचा बदला घेऊ. १९९३ साली तुम्हाला (मारिया) एक संधी मिळाली, परंतु या वेळी ती मिळणार नाही. रोक सको तो रोक लो’, असे हिंदी व इंग्रजीतून लिहिलेल्या या पत्रात म्हटले आहे. पत्राच्या शेवटी ‘मुजाहिदीन’ अशी सही आहे.
हे पत्र मिळाल्यानंतर पोलिसांनी शहरातील सतर्कता वाढवली असून दहशतवादविरोधी पथक (एटीएस), गुन्हे शाखा, राज्य गुप्तवार्ता विभाग यांच्यासह पोलीस ठाण्यांमधील दहशतवादविरोधी पथके सर्वत्र लक्ष ठेवून आहेत. ‘मुंबई शहराबाबत नेहमीच सतर्कता बाळगली जाते, मात्र हे पत्र मिळाल्यानंतर आम्ही आमची तयारी वाढवली आहे. या पत्राचा खरेखोटेपणाही तपासून घेतला जात आहे’, असे मारिया यांनी सांगितले.
पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी अलीकडेच पोलीस खात्यासाठी जारी केलेल्या एका अंतर्गत परिपत्रकात यापूर्वी महाराष्ट्रासह ठिकठिकाणी सणांच्या काळात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा संदर्भ देत पोलिसांना सतर्क राहण्याची सूचना केली होती. शुक्रवारी दहशतवादी हल्ल्यांची धमकी देणारे पत्र मिळाल्यानंतर ईदच्या पूर्वसंध्येला शहरात कडक बंदोबस्त राहील याची पुरेपूर काळजी घेण्यात येत आहे, असेही मारिया म्हणाले.
राकेश मारिया यांनी पोलीस उपायुक्त असताना १९९३ सालच्या मुंबईतील बाँबस्फोटांचा तपास केला होता आणि दाऊद इब्राहिमच्या टोळीतील अनेक गुंडांसह त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांनाही पकडले होते.

Story img Loader