५०० लिटर भेसळयुक्त दूध हस्तगत
वर्सोवा परिसरातील न्यू भारत नगर वस्तीत दूध भेसळ करणाऱ्या टोळीचा अड्डा गुन्हे शाखेने उद्ध्वस्त केला. या कारवाईत ५०० लिटर दूध हस्तगत करण्यात आले. जे नामांकित कंपन्यांच्या पिशव्यांमधून ग्राहकांपर्यंत पोहोचले असते.
गुन्हे शाखेच्या वांद्रे कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांना न्यू भारत नगर वस्तीत दूध भेसळ सुरू असल्याची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करत देसाई यांच्या पथकाने अन्न व औषध अधिकाऱ्यांसह वस्तीत छापे टाकले. तेव्हा श्रीकनिवास प्रभू, सयालू नेमाला, लिंगस्वामी बलुची आणि यादगिरी कंदीकटाका हे चौघे दूधभेसळ करताना आढळले. वस्तीतल्या चार घरांमध्ये अमूल गोल्ड, अमूल ताझा, गोकुळ क्लासिक, गोकुळ सात्विक, मदर डेअरी आणि आरएनक्यू या नामांकित कंपन्यांच्या दूध पिशव्या आढळल्या. आरोपी या पिशव्यांना सूक्ष्म छिद्र पाडून त्यातील काही दूध काढून घेत होते. पिशव्यांमध्ये पाणी भरून त्या पुन्हा होत्या तशा हवाबंद करत होते. काढून घेतलेल्या दुधातही भेसळ करून ते नामांकित कंपन्यांच्या पिशव्यांमध्ये भरत होते.
या चारही आरोपींविरोधात दूधभेसळ केल्याबद्दल गुन्हे नोंद आहेत. यापैकी बलुची याला अशाच गुन्ह्य़ांसाठी शहराबाहेर स्थानबद्ध करण्यात आले होते. मात्र त्याने मुंबईत येऊन पुन्हा दूधभेसळ सुरू केली होती.