इंद्रायणी नार्वेकर

प्लास्टिक बंदीअंतर्गत दुधाच्या पिशव्यांच्या व्यवस्थापनासाठी नियम करूनही अंमलबजावणीअभावी बेजबाबदारपणे टाकलेल्या या पिशव्यांचा कचरा आजही समुद्र किनाऱ्यांवर मोठय़ा प्रमाणावर साचून राहतो आहे. माहीमच्या समुद्राची स्वच्छता करण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना दरदिवशी हजारोंच्या संख्येने दुधाच्या रिकाम्या पिशव्या वाळूतून ओढून काढाव्या लागत आहेत. वाळूने भरलेल्या या पिशव्यांमुळे समुद्र किनारे दूषित होत आहेतच, पण पिशव्यांमुळे पर्जन्यजल वाहिन्या तुंबल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचराही होण्यासही अडथळा येत आहे.

मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर रोज मोठय़ा प्रमाणावर कचरा, प्लास्टिक पिशव्या समुद्राच्या लाटांबरोबर येत असतात. या समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी पालिकेने कंत्राटदार नेमलेले असले तरी कचऱ्याच्या ढिगापुढे ही यंत्रणा कमी पडू लागली आहे. त्यामुळे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी चळवळी सुरू केल्या आहेत. दर शनिवारी व रविवारी समुद्र किनाऱ्यांवरील कचरा उचलण्यासाठी असे

असंख्य कार्यकर्ते जात असतात. त्यापैकी माहीमचा समुद्र किनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना गेल्या अडीच वर्षांत दरवेळी मोठय़ा संख्येने दुधाच्या पिशव्या सापडतात. वाळूने भरल्यामुळे जड झालेल्या या पिशव्या रिकाम्या करून त्या गोळा करण्याचे काम हे कार्यकर्ते करतात. माहीममधील राबिया तिवारी आणि इंद्रनील सेन गुप्ता यांनी अडीच वर्षांपूर्वी ‘माहीम बीच क्लीन अप‘ ही चळवळ सुरू केली होती. हिंदुजा रुग्णालय ते रेती बंदर या परिसरात दर शनिवार, रविवारी सकाळी आठ वाजता सुमारे दीडशे कार्यकर्ते समुद्र स्वच्छतेसाठी झटतात. या मोहीमेच्या पहिल्या दिवसांपासूनच मोठय़ा संख्येने दुधाच्या रिकाम्या पिशव्या आम्हाला सापडत असल्याचे राबिया सांगते.

ही काळजी घ्या

दूधाच्या पिशव्यांचे प्लास्टिक हे उच्च प्रतीचे असते. त्याचे पुनचक्रीकरण करणे शक्य आहे. मात्र या पिशव्यांच्या विल्हेवाटीसाठी योग्य यंत्रणा नसल्यामुळे या पिशव्या कचऱ्यात टाकल्या जातात.

दुधाच्या पिशव्या उघडताना आपण त्याचा कोपऱ्याकडील भाग कापून टाकतो. त्यामुळे हे टोकसुद्धा कचऱ्यात साठून राहते. तसे न करता पिशवीला नुसताच छेद द्या.

दूध ओतून घेतल्यानंतर पिशवी पूर्ण उघडून पाण्याने धुऊन, सुकवून, जमा करून या पिशव्या रद्दीवाल्याला द्या.

महानंदचे पिशवी पुनर्खरेदी धोरण

‘दूधाच्या पिशव्यांसाठी दोन यंत्रणा राबवण्याबाबत नियमावली आहे. त्यात एक बाय बॅक पॉलिसी होती. तर दुसऱ्या पद्धतीत या पिशव्या गोळा करण्यासाठी स्वयंसेवी संस्था नेमून त्यांच्याद्वारे पिशव्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. तसेच केंद्र सरकारच्या संबंधित प्राधिकरणाला ते आपला अहवाल देतात. त्यात आम्ही दुसरी पद्धत स्वीकारलेली आहे. स्वयंसेवी संस्थांना आम्ही ठरावीक वजनाचे लक्ष्य दिलेले आहे. तेवढय़ा पिशव्या गोळा करून त्यांची विल्हेवाट लावली जाते. लवकरच आम्ही दुधाच्या रिकाम्या पिशव्यांच्या बदल्यात ग्राहकांना पैसे देणारी बाय बॅक पॉलिसी आणणार आहोत,’ अशी माहिती ‘महानंद’चे व्यवस्थापकीय संचालक शिवाजी पहीनकर यांनी दिली.

अवघ्या २५-३० कार्यकर्त्यांपासून सुरू झालेल्या या मोहिमेत आता दर आठवडय़ाला लांबूनलांबून दीडशेपर्यंत कार्यकर्ते येतात. या मोहिमेला १३० आठवडे पूर्ण झाले आहेत. गेल्या रविवारी आम्ही माहीम दर्गा परिसरातून अवघ्या दोन तासात हजारो प्लास्टिकच्या पिशव्या गोळा केल्या. एकूणच लोकांमध्ये कचरा वर्गीकरणाबाबत आणि पर्यावरणाबाबत जनजागृती करण्याची गरज आहे.

-राबिया तिवारी, माहीम बीच क्लीनअप

माहीम दर्गाच्या मागच्या बाजूला एक छोटा दर्गा आहे. अनेक जण या दग्र्यावर दूध वाहतात आणि पिशव्या तिथेच टाकतात. त्यामुळे या प्रकरणी माहीम दग्र्याच्या पीर मखदूम शाह चॅरिटेबल ट्रस्टला नोटीस धाडली आहे. याठिकाणी रिकाम्या होणाऱ्या दूधाच्या पिशव्या कचराकुंडीत टाकण्याबाबत भाविकांना सूचित करावे असे आवाहन ट्रस्टला करण्यात आले आहे.

-किरण दिघावकर, साहाय्यक महापालिका आयुक्त, जी उत्तर,

Story img Loader