मुंबई : राज्यात उन्हाच्या झळा वाढू लागताच दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना मागणी वाढली आहे. जागतिक बाजारात दूध भुकटी, बटरच्या दरात वाढ झाल्यामुळे गत दोन महिन्यात दूध खरेदी दर पाच रुपयांनी वाढला आहे. शेतकऱ्यांना सध्या ३३ रुपये प्रती लिटर दर मिळत आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात चारा आणि पाण्याच्या टंचाईमुळे दूध संकलनात घट होते. यंदा दूध संकलनात फारशी घट झाली नाही. सध्या दररोज सुमारे १ कोटी ७० लाख लिटर दूध संकलन होत आहे. मागील दोन वर्षांत उन्हाळ्यातील संकलन १ कोटी ४० लाख लिटरपर्यंत खाली येत होते. यंदाच्या उन्हाळ्यात चांगले संकलन होत आहे. दूध उत्पादन स्थिर आहे. पण, जागतिक बाजारात दूध भुकटी आणि बटरच्या पडलेल्या दरात चांगली वाढ झाली आहे. भुकटीचे दर २१० वरून २५० रुपयांवर आणि बटरचे दर ३८० वरून ४३० रुपये प्रति किलोवर गेले आहेत. त्यामुळे भुकटी आणि बटर प्रकल्पांतून दुधाला मागणी वाढली आहे. सध्या दररोज सुमारे १ कोटी १० लाख लिटर दुधाचा वापर भुकटी आणि पावडर उत्पादनासाठी केला जात आहे.

पिशवी बंद विक्रीसाठी दुधाचा तुटवडा

दैनंदिन संकलन १ कोटी ७० लाख लिटर होत असले तरीही १ कोटी १० लाख लिटरचा वापर भुकटी आणि बटर उत्पादनासाठी होत असल्यामुळे घरगुती वापरासाठी किंवा पिशवी बंद दूध विक्रीसाठी दुधाचा तुटवडा जाणवत आहे. सरासरी ८० लाख लिटरची गरज असताना जेमतेम ६० ते ६५ लाख लिटर दूध उपलब्ध होत आहे. त्यामुळे दूध खरेदीत स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे ३.५ स्निग्धांश आणि ८.५ घन पदार्थ असलेल्या दुधाला १५ जानेवारी पूर्वी २८ रुपये प्रति लिटर दर मिळत होता, आता ३३ रुपये दर मिळत आहे.

आणखी दरवाढ शक्य

गत दोन महिन्यांत दुधाच्या खरेदी दरात पाच रुपयांनी वाढ झाली आहे. भुकटी आणि बटरच्या दरवाढीमुळे प्रक्रियेसाठी दुधाची मागणी वाढली आहे. उन्हाळ्यामुळे आईस्क्रीम, दही, ताक लस्सीची मागणी वाढत आहे. सण- उत्सवामुळे श्रीखंड, आम्रखंडाच्या मागणीतही वाढ होणार असल्यामुळे पुढील महिनाभरात खरेदी दरात एक ते दोन रुपयांची वाढ होण्याचा अंदाज आहे. दरवाढीचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे, अशी माहिती दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी दिली.

Story img Loader