लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपताच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील दूधसंघांनी गायीच्या दूध खरेदी दरात प्रतीलिटर तीन रुपयांनी कपात केली आहे. या निर्णयाचा दूध उत्पादकांना मोठा फटका बसणार आहे.

राज्यात गायीच्या दुधाची खरेदी दर २३ ते २५ रुपये प्रतिलिटरपर्यंत खाली आले होते. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गायीच्या दूधाला अत्यल्प दर मिळू लागल्यामुळे प्रामुख्याने नगर जिल्ह्यातील दूध उत्पादकांनी आंदोलनाचा मार्ग स्विकारला होता. महिनाभर चाललेल्या या आंदोलनानंतर पशूसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी शेतकरी असंतोषाची दखल घेऊन गायीच्या दुधाची खरेदी ३० रुपये दराने करण्याची घोषणा केली होती. ३० रुपये दराने दूधसंघानी खरेदी करायची आणि प्रतिलिटर सात रुपये अनुदान राज्य सरकारने द्यायचे, असा ३७ रुपये प्रतिलिटरचा दर ठरविण्यात आला होता. प्रत्यक्षात कोल्हापूरात गायीच्या दुधाची खरेदी ३३ रुपयांनी होत होती, सात रुपयांचे अनुदान, असे एकूण प्रतिलिटर ४० रुपयांचा दर दूध उत्पादकांनी मिळत होता.

आणखी वाचा-पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागा वाढीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

पण, राज्यातील अन्य दूधसंघ ३० रुपयांनी दूध खरेदी करीत होते. बाजारात पिशवी बंद दूधासह अन्य दुग्धजन्य पदार्थांच्या दराच्या स्पर्धेत कोल्हापूर आणि सांगलीतील दूधसंघांचा टिकाव लागला नाही. या काळात दूध भुकटीचे दरही पडल्यामुळे ३३ रुपये प्रतिलिटर दराने दूध खरेदी शक्य होत नव्हती. गोकूळ सारखे मोठे दूधसंघ बाजारातील स्पर्धेत कसेबसे टिकून राहिले, पण, लहान दूधसंघांना वाढता तोटा सहन होईना. त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील दूधसंघांनी गायीच्या दूधखरेदी दरात तीन रुपयांची कपात केली आहे. आता प्रतिलिटर ३० रुपये दर आणि सात रुपयांचे राज्य सरकारते अनुदान, असा प्रतिलिटर ३७ रुपयांचा दर दूध उत्पादकांना मिळणार आहे. यापूर्वी ४० रुपये दर मिळत होता.

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात सहकारी दूधसंघांची संख्या मोठी असल्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दूध खरेदी दरात कपात करणे त्यांना राजकीय दृष्टीने अडचणीचे होते. त्यामुळे निवडणुकीची रणधुमाळी संपताच तातडीने गायीच्या दूध खरेदी दरात कपात करण्यात आली आहे.

आणखी वाचा-म्हाडाच्या कोकण मंडळाची सोडत लांबणीवर, अर्ज विक्री-स्वीकृतीला प्रतिसादच न मिळाल्याने मुदतवाढी देण्याची नामुष्की

दूध उत्पादनात वाढ झाली

सध्या ओल्या आणि सुक्या चाऱ्याची उपलब्धता चांगली आहे. त्यामुळे दूध उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागणी कमी आणि पुरवठा जास्त, अशी स्थिती आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापुरात खरेदी दर जास्त होता. त्यामुळे बाजारात अन्य दूधसंघांच्या स्पर्धेत उतरताना कोल्हापूर जिल्ह्यातील लहान दूध संघांची आर्थिक कोंडी होत होती. त्यामुळे दूध खरेदी दरात तीन रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती नवी दिल्ली येथील नॅशनल डेअरी असोसिएशनचे संचालक डॉ. चेतन नरके यांनी दिली.

दूध व्यवसाय अडचणीत येण्याची चिन्हे

कोल्हापूर जिल्ह्यात गायीच्या दूध खरेदी दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील अन्य दूधसंघ असेच निर्णय घेण्याची शक्यता आहे. विधानसभेची निवडणूक संपताच शेतकऱ्यांना बसलेला हा पहिला फटका आहे. एकीकडे दूध उत्पादनाचा खर्च वाढत आहे, दुसरीकडे खरेदी दर कमी होत आहे. राज्यातील दूध व्यवसाय अडचणीत येण्याची चिन्हे आहेत, असे मत अखिल किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Milk procurement price reduced by rs 3 per liter big hit to milk producers mumbai print news mrj