राज्यात गायीचे दूध प्रतिलिटर २ रुपयांनी तर म्हशीचे दूध ३ रुपयांनी महागणार आहे. गायीच्या दुधाचा दर प्रतिलिटर ३१ रुपये तर म्हशीच्या दुधाचा दर ४० रुपये होईल. दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात वाढ झाली असल्याने शासनाने दूध खरेदी दरात आणि वरकड खर्चात वाढ केली आहे. दूध दरवाढ २५ मे पासून लागू होईल, असे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी बुधवारी जाहीर केले.
शासकीय दूध योजनेसाठी दुधाचे खरेदी व विक्री दर निश्चित करण्यासाठी पशुसंवर्धन व दुग्धविकास सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या शिफारशीनुसार दूध खरेदी दर व वरकड खर्चात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. दुष्काळामुळे चारा, पशुखाद्य दरात वाढ झाली असून डिझेल दरवाढीमुळे वाहतूक खर्चही वाढला आहे. गुरांच्या देखभाल खर्चात वाढ झाली असून शेतकऱ्यांना जनावरे सांभाळणे कठीण झाले आहे. त्यामुळे आता दूध उत्पादकांकडील गायीच्या दुधाचा खरेदीदर प्रतिलिटर दीड रुपयाने वाढवून १८.५० रुपये करण्यात आला आहे. तर म्हशीचा दूध खरेदी दर अडीच रुपयाने वाढवून २७.५० रुपये प्रतिलिटर करण्यात आला आहे. दूध संघ, सहकारी संस्था, नोंदणीकृत प्रकल्प यांना देण्यात येणाऱ्या वरकड खर्चात प्रतिलिटर ५० पैशांची वाढ करुन तो तीन रुपये प्रतिलिटर करण्यात आला आहे. शासनाने दूध खरेदी दर वाढविल्याने आता शासकीय बरोबरच सहकारी आणि खासगी संस्थांमार्फत वितरीत होणाऱ्या दुधाचे दरही वाढणार आहेत.

Story img Loader