‘आपण सारे’ संस्थेच्या वतीने आयोजित क्रांती दौडमध्ये सहभागी झालेल्या सुमारे १० हजार खेळाडूंना स्पर्धेतील ढिसाळ नियोजनाचा फटका सहन करावा लागला. वेळेपेक्षा सुमारे दीड तास उशिरा सुरू झालेल्या स्पर्धेच्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या आणि बघ्यांच्या गर्दीमुळे धावपटूंना धावणे अवघड झाले होते. तर खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आलेल्या मिल्खा सिंग यांच्याभोवती कार्यकर्त्यांच्या पडलेल्या गराडय़ामुळे त्यांचे विचार ऐकण्याची आणि त्यांच्यासोबत धावण्याची संधी मात्र ठाण्याच्या धावपटूंनी गमावली.
ठाणे काँग्रेसच्या ‘आपण सारे’ संस्थेच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून ठाण्यामध्ये क्रांती दौडचे आयोजन करण्यात येते. यंदा या दौडमध्ये सहभागी होण्यासाठी ‘फ्लाइंग सीख’ मिल्खा सिंग येत असल्याने स्पर्धेत सहभागी होणाऱ्या धावपटूंची संख्या कमालीची वाढली होती.
 ठाण्यातील ३८ शाळांमधील सुमारे आठ हजार विद्यार्थानी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंद केली होती, तर ठाण्यातील अन्य भागांतून सुमारे दोन हजार खेळाडू सहभागी झाले होते.  
रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून स्पर्धेच्या ठिकाणी वर्तकनगरमध्ये खेळाडूंचे लोंढेच्या लोंढे येत होते, तर मिल्खा सिंग यांना पाहण्यासाठी देखील मोठी गर्दी उसळली होती. मात्र सुमारे दीड तास उशिरा स्पर्धा सुरू झाली.
परंतु व्यासपीठावरून खाली येत असलेल्या मिल्खा सिंग यांना संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या, आलेल्या चाहत्यांच्या गराडय़ातून चालणेदेखील अवघड झाले, त्यामुळे मिल्खा सिंग यांनी तेथून निघण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मिल्खा सिंग यांच्यासोबत धावण्याचे खेळाडूंचे स्वप्न अधुरेच राहिले.

Story img Loader