‘म्हाडा’च्या सोडतीत घर मिळालेल्या यशस्वी अर्जदारांपैकी १८ जणांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने घराच्या किल्ल्या सोपवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या पहिल्या यादीतील तब्बल ११ जणांनी बँकेचे कर्ज न घेता रोख रक्कम ‘म्हाडा’कडे जमा केली आहे.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते १८ जणांना घराचे ताबा पत्र व किल्ली देण्यात येणार आहे. त्यात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हुतात्मा झालेले गिरणी कामगार कृष्णा शिंदे यांच्या पत्नी रुक्मिणी शिंदे यांचा समावेश आहे. श्रीमती शिंदे यांना सरकारच्या घोषणेनुसार मोफत घर देण्यात येणार आहे. तर अन्य अर्जदारांनी घराच्या किमतीपोटी पैसे जमा केले आहेत. उद्याच्या यादीत पाच जणांनी बँकेचे कर्ज घेऊन पैसे भरले आहेत. या शिवाय सहा जणांना कर्ज प्रक्रिया सुरू केली आहे.
गिरणी कामगार म्हणजे फक्त उद्ध्वस्त झालेला, दारिद्रय़ात गुरफटलेला, असे दुर्दैवी चित्र वारंवार रंगवण्यात येते. काही संघटनाही घर मोफतच पाहिजे, असा आग्रह धरत कामगारांना मिळत असलेल्या घरांच्या ताब्यात मोडता घालण्याचे प्रयत्न करतात. संपात गिरणी कामगार होरपळला हे वास्तव आहे. पण गिरणी बंद पडल्यानंतर सर्व कामगार घरात बसून नव्हते. बहुतांश लोकांनी पर्यायी रोजगार मिळवत, स्वयंरोजगार करत श्रम केले. मेहनतीने ते टिकून राहिले. मुलाबाळांचे त्यांनी आपापल्या परीने शिक्षण केले. कामगारांच्या या श्रमिक वृत्तीचे, धडपडीकडे दुर्लक्ष होते. पण त्याच धडपडीतून अनेक जणांनी आपली कुटुंबे सावरली. त्यामुळेच अनेक जण बँकेचे कर्ज न घेताही घर घेण्यासाठी आपल्या शिलकीतून पैसे भरत आहेत, याचीही नोंद घेतली जायला हवी, अशी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ गिरणी कामगार नेत्याने व्यक्त केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा