गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न आणि अन्य समस्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी गिरणी कामगार संघर्ष समिती आणि अन्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार १० जानेवारी रोजी एका निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नाकडे भाजप-शिवसेना शासन दुर्लक्ष करत असल्याचे समितीचे म्हणणे आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात डिसेंबर महिन्यात घरांची सोडत काढण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र अद्याप शासनाकडून प्रतिसाद मिळालेला नाही. ‘एमएसआरडीसी’ची घरे तयार असूनही शासनाकडून घरांचे वाटप करण्यात आलेले नाही. दहा गिरण्यांची जागा ‘म्हाडा’कडे उपलब्ध असून या जागेवर गिरणी कामगारांसाठी ४ हजार ६९२ घरे बांधली जाणार आहेत. पण मुख्यमंत्र्यांनी घर बांधणीचे आदेश दिलेले नाहीत, अशी टीकाही समितीने केली आहे.

त्यामुळे गिरणी कामगारांच्या या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी १० जानेवारी रोजी दुपारी चार वाजता ललित कला भवन, डिलाईल मार्ग पोलीस ठाण्याजवळ येथे गिरणी कामगारांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दत्ता इस्वलकर, प्रवण घाग, गोविंद मोहिते, जयश्री खाडिलकर-पांडे आणि अन्य नेते मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. सर्व गिरणी कामगारांनी मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन समितीने केले आहे.

Story img Loader