मुंबई:दीड लाख गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा. तसेच आतापर्यंत गिरणी कामगारांसाठी सोडत काढण्यात आलेल्या घरांचा ताबा तात्काळ द्यावा या मागणीसाठी राज्यभरातील गिरणी कामगार नागपुरात धडकणार आहेत. सर्व श्रमिक संघटनांनी २२ डिसेंबरला मोर्चाची हाक दिली आहे. त्यानुसार या मोर्च्यात राज्यभरातील गिरणी कामगार आणि त्यांचे वारसदार सहभागी होणार आहेत.
हेही वाचा >>>मुंबई: सफाई कर्मचाऱ्यांसाठीच्या आश्रय योजनेतील घोटाळ्याप्रकरणी आज सुनावणी; लोकायुक्तांकडे भाजपने केली होती तक्रार
आतापर्यंत सरकारने म्हाडाच्या माध्यमातून अंदाजे १५ हजार घरांसाठी सोडत काढली आहे. त्यातील साधारण ५० टक्के विजेते घरांच्या प्रतीक्षेत आहेत. यानंतर सरकार केवळ १० हजार कामगारांना घरे देऊ शकणार आहे. त्यामुळे उर्वरित दीड लाख गिरणी कामगारांचे काय? त्यांना कुठे आणि कशी घरे देणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. असे असताना सरकार मात्र गिरणी कामगारांच्या प्रश्नांबाबत प्रचंड उदासीन आहे. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कोणतीही पाऊले सरकारकडून उचलली जात नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचवण्यासाठी २२ डिसेंबरला सर्व श्रमिक संघटनेच्या गिरणी कामगार विभागाने नागपूर मोर्चाची हाक दिल्याची माहिती बी. के. आंब्रे यांनी दिली. नागपूर येथील यशवंत स्टेडियम ते नागपूर विधानभवन असा हा मोर्चा असेल. सकाळी अकरा वाजता या मोर्चाला सुरुवात होणार असून त्यात मोठ्या संख्येने राज्यभरातील कामगार सहभागी होतील असा विश्वास आंब्रे यांनी व्यक्त केला आहे.