घरांच्या ताब्याची रखडलेली प्रक्रिया, रखडलेली सोडत, दीड लाख घरांची निर्मिती असे अनेक प्रश्न प्रलंबित असताना सरकार मात्र कोणताही ठोस निर्णय घेताना दिसत नाही. त्यामुळे आता कामगारांनी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बुधवारी सर्व श्रमिक संघटनेने आझाद मैदानावर मोर्चा आयोजित केला आहे. तर दुसरीकडे गिरणी कामगार संघर्ष समितीने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना स्मरणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- ‘धार्मिक उन्माद घडवणारे हे बिल्किस बानो प्रकरणाचे खरे गुन्हेगार’

कोन, पनवेल येथील घरांचा ताबा मागील कित्येक वर्षांपासून रखडला आहे. ८०० हुन अधिक कामगारांनी घराची रक्कम भरली असून अनेकांचा गृहकर्जाचा समान मासिक हप्ता सुरू झाला आहे. पण अजून ताबा मिळालेला नाही. म्हाडा आणि एमएमआरडीएच्या वादात ताबा रखडला आहे. अशात कामगारांकडून या प्रकरणी न्यायालयात न जाण्याबाबत हमीपत्र लिहून घेतले जात आहे. त्याचवेळी एमएमआरडीएच्या सुमारे २५०० घरांची सोडत रखडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोडत काढण्याचा अट्टाहास म्हाडाचा आहे. त्यानुसार सोडतीची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून म्हाडाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यांच्याकडे वेळ मागितली आहे. पण ही वेळ मिळत नसल्याने सोडत रखडली आहे. दीड लाख कामगारांना घरे देण्यासाठी सरकारकडून ठोस धोरण जाहीर केले जात नसल्याचे चित्र आहे. या सर्व प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर आक्रमक कामगारांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

हेही वाचा- बनावट शपथपत्रांप्रकरणी निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; राजकीय पक्षाच्या सहभागाबाबत तपास सुरू

सर्व श्रमिक संघटना बुधवारी सकाळी ११ वाजता आझाद मैदानावर मोर्चा नेणार आहेत. या मोर्चात मुंबई-ठाण्यासह राज्यभरातील कामगार-वारसदार सहभागी होणार आहेत. त्याचवेळी गिरणी कामगार संघर्ष समितीकडून वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांना गिरणी कामगारांच्या प्रश्नी स्मरण पत्र देण्यात येणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mill workers organized march at azad maidan on wednesday mumbai print news