लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई: गिरणी कामगारांच्या घरांच्या सोडतीसाठी रांजनोळी येथील १,२४४ घरे राखीव असून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) या घरांच्या दुरुस्तीबाबत उदासीन असल्यामुळे गिरणी कामगार संतप्त झाले आहेत. एमएमआरडीएच्या निषेधार्थ वांद्रे येथील कार्यालयाबाहेर मंगळवार, २३ मे रोजी गिरणी कामगारांनी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

एमएमआरडीएच्या भाडेतत्त्वावरील गृहप्रकल्पातील ५० टक्के घरे गिरणी कामगारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. त्यानुसार यापूर्वी पनवेलमधील कोन परिसरातील एमएमआरडीएच्या गृहप्रकल्पामधील २,४१८ घरांसाठी सोडत काढण्यात आली होती. एमएमआरडीएने ठाण्यातील रांजनोळी येथील मे. टाटा हौसिंग कंपनी लिमिटेडच्या प्रकल्पातील १,२४४, रायगड जिल्ह्यातील रायचूर येथील श्री विनय अगरवाल शिलोटर प्रकल्पातील १,०१९ आणि कोल्हे येथील मे. सांवो व्हिलेज प्रकल्पातील २५८ अशी एकूण २,५२१ घरे गिरणी कामगारांसाठी म्हाडाला उपलब्ध करून दिली. या २,५२१ घरांची सोडत काढण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई मंडळाने घेतला आहे.

हेही वाचा… मुंबई : ‘इन्‍कोव्‍हॅक’ लसीला अल्प प्रतिसाद; २० दिवसांत केवळ ८९ जणांनी घेतली लस

मात्र विविध कारणांमुळे ही सोडत रखडली. २,५२१ पैकी रांजनोळी १२४४ घरांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. करोनाकाळात या घरांचा वापर कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेने अलगीकरणासाठी केला होता. या काळात घरांची दुरवस्था झाली आहे. दुरुस्ती करूनच या घरांची सोडत काढावी, अशी भूमिका गिरणी कामगार कृती समितीने घेतली आहे. मात्र या घरांच्या दुरुस्तीची जबाबदारी एमएमआरडीएची असल्याची भूमिका घेत म्हाडाने हात वर केले आहेत. करोनाकाळात अलगीकरणासाठी या घरांचा वापर करणाऱ्या कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेने त्यांची दुरुस्ती करावी अशी भूमिका एमएमआरडीएने घेतली आहे. एमएमआरडीएने महानगरपालिकेला यासंबंधी पत्रही पाठविले आहे. महानगरपालिकेने मात्र अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. एकूणच या सर्व वादात घरांची सोडत रखडली आहे.

हेही वाचा… संजय राऊतांचा राहुल नार्वेकरांना टोला; म्हणाले, “एखादा चांगला घटनातज्ज्ञ असेल तर २४ तासांत…!”

या पार्श्वभूमीवर आता गिरणी कामगारांनी या घरांच्या दुरुस्तीसाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. गिरणी कामगार कृती समितीच्या नेतृत्वाखाली मंगळवार, २३ मे रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत एमएमआरडीएच्या वांद्रे येथील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती कृती समितीने दिली. या आंदोलनात मोठ्या संख्येने गिरणी कामगार सहभागी होणार आहेत. या धरणे आंदोलनानंतर एमएमआरडीएने ठोस भूमिका घेतली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समितीने दिला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mill workers protest against mmrda on tuesday in mumbai print news dvr
Show comments