मुंबई: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) भाडेतत्वावरील गृहप्रकल्प योजनेतील गिरणी कामगारांसाठी राखीव असलेल्या २५२१ घरांच्या सोडतीची कामगारांना प्रतीक्षा आहे. घरांची दुरुस्ती पुर्ण झाल्याचे म्हणत ही घरे म्हाडाच्या मुंबई मंडळाला हस्तांतरीत करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. मात्र घरांची पूर्ण आणि योग्य दुरुस्ती झाली आहे का याची खात्री केल्याशिवाय घरे म्हाडाकडे हस्तांतरीत करु नयेत अशी भूमिका गिरणी कामगार संघटनांनी घेतली आहे. त्यासाठी लवकरच गिरणी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींकडून घरांची पाहणी करण्यात येणार आहे. या पाहणीत घरांची दुरुस्ती योग्य प्रकारे झाली असेल तरच घरे म्हाडाकडे हस्तांतरीत करून घरांची सोडत काढण्यास कामगारांचे समर्थन असेल, अशी भूमिका गिरणी कामगार संघटनांनी घेतली आहे.

दीड लाख गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने एमएमआरडीएच्या भाडेतत्वावरील घरांपैकी काही घरे गिरणी कामगारांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार एमएमआरडीएने यापूर्वी कोन, पनवेलमधील घरे गिरणी कामगारांसाठी उपलब्ध करुन दिली असून २०२२ मध्ये आणखी २५२१ घरे गिरणी कामगारांसाठी उपलब्ध झाली आहेत. त्यात एमएमआरडीएच्या भाडेतत्त्वावरील प्रकल्पाअंतर्गत रांजनोळी, ठाणे येथील मे. टाटा हाऊसिंग कंपनी लिमिटेड प्रकल्पातील १२४४, रायचूर, रायगड येथील श्री विनय अगरवाल शिलोटर प्रकल्पातील १०१९ आणि कोल्हे येथील मे. सांवो व्हिलेज प्रकल्पातील २५८ अशा एकूण २५२१ घरांचा यात समावेश आहे. मात्र २०२२ पासून या घरांच्या सोडतीची प्रतीक्षा आहे. ही घरे करोना काळात अलगिकरणासाठी वापरण्यात आल्याने त्या घरांची दुरवस्था झाल्याने घरांच्या दुरुस्तीची मागणी झाली. त्यानंतर दुरुस्ती कोण करणार यावरुन वाद झाला आणि सोडत रखडली. शेवटी राज्य सरकारने एमएमआरडीएकडून घरांची दुरुस्ती करुन घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार एमएमआरडीएने दुरुस्तीचे काम हाती घेतले असून आता दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याचे एमएमआरडीएकडून सांगितले जात आहे. लवकरच ही घरे म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे हस्तातंरीत केले जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी एमएमआरडीएच्या कार्यालयात सह महानगर आयुक्त राधाबिनोद ए. शर्मा यांनी गिरणी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. यावेळी गिरणी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी घरांची पाहणी करण्याची मागणी केली.

घरांच्या दुरुस्तीची पाहणी करत दुरुस्ती योग्य प्रकारे झाली आहे का याची पाहणी केल्यानंतरच ही घरे म्हाडाला हस्तांतरीत करावी अशी भूमिका संघटनांनी यावेळी घेतल्याची माहिती गिरणी कामगार संघर्ष समितीचे प्रवीण येरुणकर यांनी दिली. त्यानुसार लवकरच गिरणी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींकडून घरांची पाहणी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आता गिरणी कामगारांनी या घरांना पसंती दिली तरच या २५२१ घरांच्या सोडतीचा मार्ग मोकळा होणार आहे. दरम्यान याविषयी राधाबिनोद शर्मा यांना विचारणा केली असता त्यांनी गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न समजावून घेण्यासाठी आज गिरणी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader