लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: गिरणी कामगारांना अद्यापही घरे मिळालेली नाहीत. सरकारकडून वारंवार आश्वासन देण्यात येत आहेत. परंतु घरांचा प्रश्न ‘जैसे थे’ आहे. हा प्रश्न मार्गी लागावा, गिरणी कामगारांना घरे मिळावी या प्रमुख मागणीसाठी गुरुवारी गिरणी कामगार आझाद मैदानावर धडकणार आहेत.
आणखी वाचा-पोलिसाला रिक्षासोबत फरफटत नेले; विरुद्ध दिशेने रिक्षा चालवणाऱ्या चालकाचा प्रताप
दीड लाख गिरणी कामगारांना कुठे आणि कधी घरे देणार याबाबतचे धोरण राज्य सरकारने जाहीर केलेले नाही. सोडतीतील घरांचा ताबा देण्यास विलंब होत आहे. कामगारांचा गृहकर्जाचा समान मासिक हप्ता सुरू झाला आहे. मात्र तरीही त्यांना घराचा ताबा मिळालेला नाही. त्यामुळे सरकार गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नाबाबत गंभीर नसल्याचा आरोप करीत सर्व श्रीमिक संघटनेने गुरुवारी मोर्चाची हाक दिली आहे. गुरुवार, २० जुलै रोजी सकाळी ११ वाजता आझाद मैदानावर मोठ्या संख्येने गिरणी कामगार जमा होणार असल्याची माहिती सर्व श्रमिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. घरांच्या प्रश्नासाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघानेही २५ जुलै रोजी मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चातही मोठ्या संख्येने गिरणी कामगार सहभागी होणार आहेत.