वैद्यकीय शाखेसाठी प्रवेश मिळवून देतो, असे सांगून लाखो रुपये उकळणाऱ्या महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवनंदा लावंड यांना मंगळवारी आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली. दोन विद्यार्थ्यांच्या पालकांच्या तक्रारीवरून अटक करण्यात आली असली तरी फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
वैद्यकीय  तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून देतो, असे सांगून डॉ. लावंड यांनी अनेक विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळले होते. प्रवेश न मिळाल्याने या विद्यार्थ्यांनी पैसे परत मागितले. तेव्हा डॉ. लावंड यांनी टाळाटाळ केली.  काही विद्यार्थ्यांना त्यांनी धमकावले. यापैकी सहा-सात विद्यार्थ्यांनी जूनमध्ये आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तरीही पोलिसांकडून काहीही कारवाई होत नव्हती.
शेवटी राजेंद्र मद्येवाड व मंजुळा कुळकर्णी यांनी आपल्या पाल्यास प्रवेश देण्याच्या आमीषाने अनुक्रमे दहा व १३ लाख रुपये उकळल्याची तक्रार पोलीस ठाण्याला दिल्यानंतर जानेवारी २०१५ मध्ये गुन्हा दाखल झाला. परंतु त्यांना अटक झाली नव्हती. अखेरीस मंगळवारी डॉ. लावंड यांना अटक करण्यात आली.

Story img Loader