राज्यातील शिक्षक भरतीसाठी राज्य शासनाने घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल ४५ दिवस उलटून गेले तरी लागलेला नाही. यामुळे लाखो परीक्षार्थीचे भवितव्य टांगणीला लागले आहे. शिक्षक पात्रता परीक्षा होऊन ४५ दिवस उलटून गेले तरी उत्तरपत्रिका तपासणीचे कामही अद्याप सुरू झालेले नाही. राज्य परीक्षा परिषदेने दोन दिवसांपूर्वी अंतिम उत्तरसूची त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली. यामध्ये सर्व माध्यमे मिळून ३७ प्रश्न रद्द ठरविण्यात आले आहेत. यामुळे उत्तरपत्रिका तपासणीचे कामही रखडलेले आहे. यासंदर्भात ‘प्रहार विद्यार्थी संघटने’ने शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये चुकीचे प्रश्न विचारणाऱ्या परीक्षा मंडळावर कारवाई व्हावी, निकाल लवकरात लवकर जाहीर व्हावा, राज्यातील शिक्षकांच्या रिक्त जागा त्वरित भरल्या जाव्यात तसेच चुकीच्या प्रश्नांचे गुण विद्यार्थ्यांना देण्यात यावेत या मागण्यांचा समावेश आहे. या मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अ‍ॅड. अजय तापकीर यांनी दिला आहे. या परीक्षेला राज्यभरातून ६.५ लाख परीक्षार्थी बसले होते.