मुंबई : झाडांची शितल छाया, वन्यप्राण्यांचा अधिवास, पक्ष्यांची किलबिल आणि पेंग्विन दर्शन घडवणाऱ्या आणि लहान मुलांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू असलेल्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले नवस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाकडे (राणीची बाग) दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात पर्यटकांची पावले वळत आहेत. याच पार्श्वभूमीवर राणीच्या बागेत लवकरच बच्चे कंपनीसाठी मिनी बस आणण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भायखळा येथील राणीच्या बागेचा झपाट्याने होणारा कायापालट पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षात येथे पर्यटकांची गर्दी वाढताना दिसत आहे. वन्य अधिवासाची अनुभूती देणारे प्राण्यांसाठी नव्याने उभारण्यात आलेले पिंजरे, प्राण्यांची वाढती संख्या, नेटके व्यवस्थापन यांची भुरळ पर्यटकांना पडत आहे. यातच आता लहान मुलांसाठी राणीच्या बागेत मिनी बस आणण्यात येणार आहे. यामुळे बच्चे कंपनीसाठी ही पर्वणी असेल. दरम्यान, किती बस असणार, त्या केव्हापर्यंत आणणार हे अजून ठरायचे आहे, असे राणीबागेचे जनसंपर्क अधिकारी अभिषेक साटम यांनी सांगितले.

पेंगिवन आणल्यापासून राणी बागेला बच्चे कंपनीसह इतर मुंबईकरांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पालिकेला अतिरिक्त महसूल मिळत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. राणीच्या बागेत सर्पालय उभारण्यात येणार असून त्यासाठी केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी मिळाली आहे. येत्या काही महिन्यांत सर्पालयाच्या बांधकामास सुरुवात होणार असून २०२६ पर्यंत हे पूर्ण होण्याची शक्यता आहे. जुने सर्पालय तोडून १६८०० चौरस फूट जागेत नव्याने बांधण्यात येणार आहे. त्यामुळे उद्यानात येणाऱ्या पर्यटकांना यापुढे विविध प्रजातींचे साप पहायला मिळतील. दरम्यान, प्राणी संग्रहालयात सध्या शक्ती, करिश्मा ही वाघाची जोडी, अस्वल, हरण, अजगर, तरस आणि पेंग्विन, वाघ, शेकडो प्रकारचे पक्षी, हत्ती, हरणे, माकडे, तरस आदी प्रकराचे १३ जातीचे ८४ सस्तन प्राणी, १९ जातींचे १५७ पक्षी आहेत. याशिवाय २८३ प्रजातींचे आणि ६६११ वृक्ष- वनस्पती आहेत. तर रंगीत करकोचा, छत्रबालक, विविध प्रकारचे बगळे, सारस असे पाणथल पक्षीही आहेत.