कोकण रेल्वेतून जाणाऱ्या प्रवाशांना छोटय़ा खरेदीसाठी वेळ दवडण्याची आता गरज नाही. चालत्या गाडीतच त्यांना  फुटकळ बाजारहाट करता येणार आहे. आपल्या पसंतीचे जेवण, सोबत नसली तरी सामानाची ने-आण करण्यासाठी खास व्यवस्था करून प्रवाशांना अधिकाधिक सोयीसुविधा देणाऱ्या कोकण रेल्वेने आता प्रवाशांच्या फुटकळ खरेदीचीही व्यवस्था गाडीमध्येच करून दिली आहे. ‘व्हॅलेन्टाइन डे’ची ही भेट असल्याचे कोकण रेल्वेचे म्हणणे आहे.
यापूर्वी कोकण रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांसाठी मदतनीस आणि तसेच उत्तम जेवणाची सोय उपलब्ध करून दिली होती. पाठोपाठ आता बाजारहाटाची व्यवस्था मांडवी एक्स्प्रेस आणि कोकणकन्या या गाडय़ांमध्ये केली आहे. मुंबईतून कोकणात जाणारे प्रवासी आपल्या मित्रमंडळींसाठी आणि घरातल्यांसाठी खास आठवणीने काही वस्तू खरेदी करून नेतात, ही मानसिकता लक्षात घेऊन गाडीमध्ये अनेक विक्रेते अशा किरकोळ वस्तू विकण्यास येतात. स्थानकावर गाडी थांबल्यावरही अशी खरेदी होत असते. अनेकदा गाडीत शिरलेले विक्रेते प्रवाशांचे सामान चोरण्याचे उद्योगही करत असत. या विक्रेत्यांना आळा घालण्याबरोबरच महिला प्रवाशांची मानसिकता लक्षात घेऊन पिना, मनगटी घडय़ाळे, गॉगल्स, पोर्टेबल म्युझिक सिस्टम, मोटारगाडय़ांमधील किरकोळ इलेक्ट्रॉनिक वस्तू, पर्स, कंबरेचे पट्टे, पाकिटे, छोटी खेळणी, सुगंधी द्रव्ये आदी वस्तू गाडीमध्येच विकण्यासाठी येणार आहेत. त्यासाठी कोकण रेल्वेने ‘आवा र्मकडाइजिंग सोल्युशन्स प्रा. लि.’ या कंपनीबरोबर सहकार्य करार केला असून केवळ या कंपनीच्याच विक्रेत्यांना गाडीत प्रवेश देण्यात येणार आहे. माणगाव ते कुडाळदरम्यान या विक्रेत्यांना विक्रीचा परवाना देण्यात आल्याचे कोकण रेल्वेच्या प्रवक्त्यांचे म्हणणे आहे.

मिनी मॉलमध्ये काय असेल?
पिना, मनगटी घडय़ाळे, गॉगल्स, पोर्टेबल म्युझिक सिस्टम, मोटारगाडय़ांमधील किरकोळ इलेक्ट्रॉनिक वस्तू, पर्स, कंबरेचे पट्टे, पाकिटे, छोटी खेळणी, सुगंधी द्रव्ये आदी वस्तू गाडीमध्येच विकण्यासाठी येणार आहेत.

Story img Loader