मुंबई : मुंबईत मागील एक – दोन दिवसांपासून काहीसा गारवा जाणवू लागला असून, बुधवारी तापमापकावरही पारा २० खाली घसरला. सांताक्रूझ येथे बुधवारी १९.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मात्र, कमाल तापमानाचा पारा ३० अंशाहून अधिक असल्याने दिवसा मात्र उकाडा कायम आहे. मुंबई शहर आणि उपनगरांतील नागरिकांना पहाटे किंचित गारवा आणि दुपारी उकाडा अशा हवामानाला तोंड द्यावे लागत आहे. किमान तापमानात घसरण झाली असली तरी सध्या कमाल तापमानाचा पारा चढाच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात बुधवारी २३ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात १९.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ येथे किमान तापमान मंगळवारपेक्षा १ अंशाने कमी होते. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन ते चार दिवस मुंबईतील कमाल तापमानात फारसा फरक जाणवणार नाही. संपूर्ण फेब्रुवारी महिना तापमानाचा पारा चढाच राहिल्यामुळे मुंबईकरांना पहाटेचा गारवा अनुभवता आला नाही. महिन्यातील काही दिवस सोडले तर किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली होती. दरम्यान, पुढील एक – दोन दिवस मुंबईत किमान तापमानात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबई व परिसरात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उष्मा जाणवत आहे. दिवसा आणि रात्रीचे तापमानही जास्त होते. यामुळे पहाटेचा गारवा नाहीसा झाला होता. तब्बल एक महिन्याने बुधवारी किमान तापमान २० अंशाखाली नोंदले गेले. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात बुधवारी ३३.४ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३७.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

सध्या शहरात दिवसा उन्हाचा ताप आणि उकाडा सहन करावा लागत आहे. दर दोन दिवसांनी कमाल आणि किमान तापमानात होत असलेल्या बदलामुळे मुंबईकरांना त्रास होत आहे. दरम्यान, पुढील एक ते दोन दिवस किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या कालावधीत किमान तापमान १८ ते १९ अंश सेल्सिअस राहील. यामुळे मुंबईकरांना गारव्याचा सुखद अनुभव घेता येईल. मात्र, दुपारी काही प्रमाणात उन्हाच्या तप्त झळा सहन कराव्या लागतील.