मुंबईसह राज्यभरात तापमानात घसरण झाली असून गारठा जाणवू लागला आहे. सांताक्रूझ येथील किमान तापमान रविवारी १५ अंशापर्यंत घसरल्याने पहाटे मुंबईला दाट धुक्यानी वेढले होते. पहाटे हिरव्या पानांवर दवबिंदू गोठला होता, तर अनेक बागांमधून मोगऱ्याचा गंध सुटला होता. गुलाबी थंडी, दाट धुके आणि दव अशा मोहक वातावरणाचा मुंबईकरांनी आनंद लुटला. दरम्यान, पुढील दोन दिवस मुंबईवर दाट धुक्याची चादर पसरण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हेही वाचा- राज्यात केवळ १७ लाख, तर मुंबईमध्ये सहा हजार लसींचा साठा उपलब्ध; वर्धक मात्रेसाठी लशींची चणचण
उत्तर भारतात थंडीची लाट आली असून त्यामुळे मुंबईसह राज्य गारठले आहे. धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने सर्व वाहनांचा वेगही मंदावला. सकाळी मैदानात खेळायला, व्यायाम करायला येणाऱ्यांनी धुक्याचा मनसोक्त आनंद लुटला. वातावरणात गारवा वाढल्याने थंडीपासून रक्षणासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या होत्या. कुलाब्यात यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच किमान तापमान १८.५ अंशापर्यंत खाली आले आहे. शनिवारीच्या तुलनेत सांताक्रूझ येथील किमान तापमान १ अंशाने आणि कुलाबा येथील ०.३ अंशाने कमी झाल्याची नोंदले. तर, सरासरी किमान तापमानाच्या तुलनेत सांताक्रूझ आणि कुलाबा येथील किमान तापमान अनुक्रमे ३ अंश आणि २ अंशाने कमी झाले.
हेही वाचा- मुंबई : मोडक सागर धरणाची दुरुस्ती ; धरण सुरक्षा संघटनेचा मुंबई महानगरपालिकेला अहवाल सादर
गेल्या तीन महिन्यात राज्यभरात थंडीचा प्रभाव दिसून आला नाही. मात्र, शुक्रवारपासून थंडीचा प्रभाव वाढला असून दाट धुके पसरले आहे. सध्या उत्तरेकडून वाहणारे वारे हे कोरड्या स्वरूपाचे आहेत. मात्र येत्या दोन दिवसात दक्षिण दिशेकडून वारे वाहू लागणार असून ते दमट स्वरूपाचे असतील. त्यामुळे पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.