लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : राज्यात अनेक भागातील तापमानात घट होऊ लागली असून थंडी पडायला सुरुवात झाली आहे. मुंबईतील किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मुंबईतील रात्रीचे तापमान १८ ते १९ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना रात्री गुलाबी थंडी अनुभवता येईल.
मुंबईमध्ये कमाल तापमानाचा पारा अजूनही चढाच आहे. मुंबईकरांना पहाटे धुके आणि दुपारी उन्हाच्या कडाक्याचा सामना करावा लागत आहे. उपनगरांतील किमान तापमान २१ ते २२ अंश सेल्सिअस इतके राहील. प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १२,१३ आणि १४ डिसेंबर रोजी रात्रीचे तापमान २० अंश सेल्सिअसपर्यंत खाली येईल. तर, १५, १६ डिसेंबर रोजी तापमान १९ अंश सेल्सिअसदरम्यान असेल. दरम्यान, उत्तरेकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह अधिक वाढेल आणि त्यामुळे मुंबईतील रात्रीच्या तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा-महिला क्रिकेटरच्या आईची सायबर फसवणूक
दिवसाचे तापमान मात्र जास्तच
मुंबईकरांना रात्री गुलाबी थंडी अनुभवता येणार असली तरी, दिवसा तापमान मात्र ३० अंश सेल्सिअसच्या पुढे राहील, अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात येत आहे. तसेच आर्द्रता ६५ टक्क्यांवरून ५५ टक्क्यांपर्यंत येऊ शकते. दरम्यान, मुंबईकरांची आर्द्रतेपासून सुटका होईल. मात्र दिवसा तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअसदरम्यान राहील.