लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : या आठवड्यात उपनगरातील किमान तापमानातील घट कायम असून, गुरुवारी सांताक्रूझ केंद्रात किमान तापमान १९ अंशाखाली नोंदले गेले. तेथे १८.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
उत्तरेतील थंड वाऱ्यामुळे राज्यातील विशेषत: उत्तर महाराष्ट्राच्या किमान तापमानात घट होत आहे. मुंबईत उपनगरात किमान तापमान आठवड्याच्या सुरुवातीस २० अंशाखाली घसरले. मागील तान – चार दिवसांपूर्वी ते १९ अंशापर्यंत पोहोचले, गुरुवारी त्यामध्ये आणखी घट होऊन सांताक्रूझ केंद्रावर १८.५ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. नोव्हेंबर महिन्यात प्रथमच किमान तापमान १९ अंशाखाली गेले आहे. पुढील काही दिवस यामध्ये फार मोठा बदल अपेक्षित नसल्याचे हवामान विभागाने सांगितले.
आणखी वाचा-मुंबई : इन्फ्लूएंझाने होणाऱ्या मृत्यूत वाढ, गतवर्षाच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण अधिक
सांताक्रूझ केंद्रावर किमान तापमानात घट झाली असली तरी कुलाबा केंद्रावर किमान तापमान स्थिर आहे. गुरुवारी कुलाबा येथे २३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. किमान तापमानात घट झाली असताना गुरुवारी दोन्ही केंद्रावर कमाल तापमान ३० अंशापुढे होते. कुलाबा येथे ३२.९ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३३.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मुंबईच्या कमाल तापमानात सध्या चढ-उतार सुरू असून काही दिवस हीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
आणखी वाचा- मुंबईत मतटक्का वाढला, अणुशक्ती नगर आणि चांदिवलीचा अपवाद
हवा गुणवत्तेत सुधारणा
मागील काही दिवस मुंबईच्या हवेचा दर्जा खालावला होता. अनेक भागात सातत्याने ‘वाईट’ हवा नोंदवली जात होती. दरम्यान, तीन दिवसांपासून मुंबईच्या हवेत काहीशी सुधारणा झाली आहे. अनेक भागात ‘मध्यम’ श्रेमीत हवा नोंदली जात आहे. बोरिवली येथे ‘समाधानकारक’ हवेची नोंद झाली. तेथे हवा निर्देशांक ९४ इतका होता. तर इतर भागात हवा निर्देशांक १०० ते १५०च्या आसपास होता.