मुंबई : गेल्या आठवडाभरात मध्य महाराष्ट्रात पारा नऊ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला होता. पण, रविवारी ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे किमान तापमानात वाढ झाली असून, किमान तापमान ११ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे राज्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेला आठवडाभर मध्य महाराष्ट्रात किमान तापमान नऊ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. नाशिक, नगर, पुण्यात गारठा वाढला होता. पण, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या फेंगल चक्रीवादळामुळे राज्यात बाष्पयुक्त वारे येत आहेत. त्यामुळे राज्याच्या बहुतेक भागात ढगाळ वातावरण निर्माण होऊन थंडी कमी झाली आहे. नऊ अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेलेला पारा पुन्हा ११ अंश सेल्सिअसवर आला आहे.

हेही वाचा…ठाणे जिल्हा रुग्णालयात रविवारी एकाच दिवशी झाल्या ७२ लहान मुलांवर शस्त्रक्रिया!

दरम्यान, राज्यात येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पाच डिसेंबरपर्यंत राज्याच्या बहुतेक भागात हलक्या ते अत्यंत हलक्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत पावसाची शक्यता अधिक आहे, अशी माहिती हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

हेही वाचा…दीड कोटी बालकांना आरोग्य विभाग देणार जंतनाशक गोळी!राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमीत्त…

पुढील आठवड्यातील थंडी

रविवारपासून (८ डिसेंबर) थंडीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. फेंगल चक्रीवादळामुळे राज्यात तयार झालेले ढगाळ वातावरण निवळून पुन्हा थंडी पडण्याचा अंदाज आहे. पश्चिमी विक्षोप (थंड हवेचे झंझावात) सतत सक्रीय होत असल्यामुळे प्रामुख्याने हिमालयात अपेक्षित बर्फवृष्टी होत आहे. परिणामी उत्तर भारतातून राज्यात थंड वारे येत येऊन पुढील आठवड्यात पुन्हा राज्यभरात थंडी वाढेल, असा अंदाजही खुळे यांनी व्यक्त केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minimum temperature increased to 11 degree celsius due to cloudy weather on sunday mumbai print news sud 02