मुंबई: ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थींच्या अर्जांची छाननी करण्यात येणार असल्याचे महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवारी जाहीर केले. एकूण पाच निकषांच्या आधारे अर्ज बाद करण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी योजनेसंदर्भात चर्चा केल्यानंतर छाननीचा निर्णय घेण्यात आल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.
निवडणूक निकालांनंतर मात्र मंत्रिमंडळ निवडले जाण्यापूर्वी योजनेच्या अर्जांची छाननी होणार असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने दिले होते. मात्र त्या वेळी तटकरे यांनी त्याचे खंडन केले होते. गुरुवारी त्यांनी स्वत:च यावर शिक्कामोर्तब केले. योजनेसाठी एकूण दोन कोटी ६३ लाख अर्ज आले होते. त्यातील दोन कोटी ४७ लाख अर्ज पात्र ठरले. बँक खात्याशी आधार कार्ड जोडल्या गेलेल्या दोन कोटी ३४ लाख जणींना योजनेचा लाभ मिळाला. निवडणुकीनंतर सरकारने बँक खाते जोडलेल्या १२ लाख ६७ हजार लाभार्थींना पहिल्यांदा निधी देण्यास सुरुवात केली. त्यानंतर पाच महिन्यांचा लाभ घेतलेल्या बहिणींना डिसेंबरचा लाभ दिला जात आहे. लाडक्या बहीण योजनेवर सरकारचे वर्षाला ४६ हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम खर्च होणार आहे. त्याचा परिणाम इतर योजना व पायाभूत सुविधांवर होणार आहे. या योजनेतील लाभार्थींच्या अर्जांची पडताळणी करणार आहे. त्यासाठी वर्धा, पालघर, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यातून स्थानिक पातळीवरून तक्रारी आल्या असल्याचे कारण सांगितले जात आहे. ही पडताळणी तक्रारनिहाय केली जाणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले. त्यानिमित्ताने केशरी व पिवळे कार्ड वगळता सर्वच अर्जांची पडताळणी होणार आहे.
हेही वाचा : मंत्रालयात सर्वसामान्यांच्या प्रवेशावर कठोर निर्बंध
अर्ज बाद करण्याचे निकष
●कुटुंबाचे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न
●घरात कोणाच्याही नावावर चारचाकी वाहन
●शासकीय नोकरी असताना घेतलेला योजनेचा लाभ
●इतर शासकीय योजनांचा लाभ
●विवाहानंतर परराज्यात गेलेल्या लाभार्थी
हेही वाचा : अजित पवार मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर, तात्काळ पदभार स्वीकारा; मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांचे आदेश
प्राप्तिकर विभाग आणि परिवहन विभागाकडून माहिती मागविली आहे. मर्यादेपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न किंवा घरात चारचाकी वाहन असल्याबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आकडेवारी मिळाल्यानंतर तक्रारींचे निवारण केले जाईल. – आदिती तटकरे, महिला व बालविकासमंत्री