राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर बोलताना न्यायालयात कामगारांची बाजू मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी सदावर्ते कामगार संपाला संप न म्हणता दुखवटा का म्हणत आहे याचं कारणही सांगितलं. एसटी कर्मचारी अत्यावश्यक सेवेत येतात. त्यांनी काम बंद केल्यानं विद्यार्थी, रूग्ण आणि ग्रामीण भागातून येणाऱ्यांची अडवणूक होत आहे, असा आरोप परब यांनी केला. तसेच कोर्टाच्या कारवाईच्या भीतीने सदावर्ते संपाला दुखवटा म्हणत असल्याचं सांगितलं. ते टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.
अनिल परब म्हणाले, “तुम्ही अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आहात. असं असतानाही तुम्ही काम बंद करून जनतेला नाडलं आहे. आज तुमच्यामुळे जनता अडकली आहे. शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांना शाळेत जायला बसेस नाहीत, रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांना गावातून तालुक्याला जिल्ह्याला येणं आहे हे सर्व अडकून बसले आहेत. अशाप्रकारे अडवून ठेवलं असेल तर याला संप म्हणायचा नाही, तर काय म्हणायचं?”
“सदावर्तेंना कोर्टाची कारवाई होईल अशी भीती”
“सदावर्ते वकील आहेत. त्यांना माहिती आहे की कोर्टात आम्ही कंटेम्प्ट पिटीशन दाखल केलंय. त्यामुळे त्यांनी हा संप मान्य केला तर त्यांच्यावर कोर्टाची कारवाई होईल अशी त्यांना भीती आहे. म्हणून ते संपात नसून दुखवट्यात आहे असं म्हणत आहेत,” असं अनिल परब यांनी सांगितलं.
“…म्हणून आता सदावर्ते उद्या कोर्टात कुणाचे वकील म्हणून उभे राहतात हे पाहायचं आहे”
अनिल परब म्हणाले, “मी गुणरत्न सदावर्तेंशीही बोललो. त्यांनी विलिनीकरणाशिवाय दुसरं कशावरही बोलायचं नाही असं सांगितलं. विलिनीकरणाचा मुद्दा तर सध्या समितीसमोर आहे. त्यामुळे मी त्यांच्याशी बोलून उपयोग झाला नाही. सदावर्ते वकील आहेत त्यांनी या संपाबाबत त्यांची भूमिका कोर्टात मांडली पाहिजे. ते जर कामगार नेते असतील तर त्यांनी तसं सांगायला हवं. त्यांनी अजय गुजर यांच्या युनियनचं वकीलपत्र घेतलं होतं. त्यांनी संपातून माघार घेतली आहे. त्यामुळे उद्या ते कोर्टात कुणाचे वकील म्हणून उभे राहतात हे मला पाहायचं आहे.”
“ज्या संघटनेने संपाची नोटीस दिली होती त्या संघटनेनेच संप मागे घेत असल्याचं जाहीर केलंय. त्यात उद्या कोर्टात सुनावणी आहे. त्यामुळे आम्ही कर्मचाऱ्यांना उद्यापर्यंतची वेळ दिली आहे. त्यामुळे उद्या कामगार कामावर येतील असं वाटतं,” असं अनिल परब यांनी नमूद केलं.
हेही वाचा : एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावणार का? अनिल परब यांनी राज्य सरकारची भूमिका केली स्पष्ट; म्हणाले “सध्या…”!
“आम्ही अजून कुणाशी बोलायचं हाच प्रश्न आहे”
अनिल परब यांनी संपात नेतृत्व राहिलं नसल्याचंही म्हटलं. ते म्हणाले, “आम्ही १ लाख कर्मचाऱ्यांशी तर बोलू शकत नाही. मी या कर्मचाऱ्यांच्या २९ युनियन्सशी बोललो आहे. यानंतर युनियन्सला बाजूला ठेवत गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांनी कामगारांचं नेतृत्व केले. आम्ही त्यांच्याशीही बोललो. अजय कुमार गुजर ज्यांनी संपाची नोटीस दिली आणि त्या नोटीसवर हा संप सुरू होता आम्ही त्यांच्याशी बोललो. अजून कुणाशी बोलायचं हाच प्रश्न आहे.”