मुंबई : अपात्र झोपडीधारकांना मुंबईत घर देणारा ‘धारावी पुनर्विकास’ हा एकमेव प्रकल्प असून या प्रकल्पातील एक इंचही जागा अदानी कंपनीला देण्यात आलेली नाही, अशी माहिती मंत्री आशीष शेलार यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. २९३ अन्वये विरोधकांनी गृहनिर्माण विभागाशी संबंधित केलेल्या सूचनेला शेलार यांनी उत्तर दिले.

धारावीतील ४३० एकर जागेपैकी ३७ टक्के जागेत खेळाचे व मनोरंजन मैदान असणार आहे. धारावीची जमीन अदानीला दिली हे असत्य आहे. धारावीच्या जागेची मालकी धारावी पुनर्विकास प्राधिकरण (डीआरपी) या राज्य सरकारच्या कंपनीची आहे. खोटे बोलणाऱ्यांनी अदानीच्या नावाने एकतरी सातबारा दाखवावा, असे आव्हान शेलार यांनी दिले.

‘डीआरपी’ कंपनी पुनर्विकासाची कंत्राटदार कंपनी म्हणून काम पाहणार आहे. कंत्राटदाराला निविदेनुसार जे फायदे होतील, त्यातील २० टक्के हिस्सा राज्य सरकारला मिळणार आहे. धारावीतील ५० टक्के जागा महापालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकारची आहे. पात्र झोपडधारकांना धारावीत तर अपात्र झोपडीधारकांना मुंबईत घरे देणारा एकमेवर प्रकल्प धारावी असल्याचा दावा शेलार यांनी केला .