राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या निधानवर दुःख व्यक्त केलं. तसेच आपल्या आठवणींना उजाळा दिला. माझे आणि लता मंगेशकर यांचे घर जवळजवळ असूनही त्यांची भेट झाली नसल्याचं म्हटल्यानंतर त्यावर लता मंगेशकर यांच्या प्रतिक्रियेची आठवणही बाळासाहेब थोरात यांनी सांगितली. त्यांनी ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
बाळासाहेब थोरात म्हणाले, “स्वरसम्राज्ञी, भाररत्न लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. आपल्या दैवी स्वरांच्या माध्यमातून त्यांनी जगभरातील श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. लतादीदी शरीराने आपल्यातून गेल्या असल्या, तरी आपल्या सुमधुर स्वरांनी त्या अजरामर झाल्या आहेत. माझे व दीदींचे निवासस्थान जवळ जवळ असून त्यांची भेट झाली नाही असे मी एका मुलाखतीत म्हटलो होतो. त्यानंतर मला फोन करून त्या म्हणाल्या बाळासाहेब कोविडमुळे मला घराच्या बाहेर पडता येत नाही आणि कोणाला बोलवता येत नाही. कोविड संपल्यावर आपण भेटू. ती भेट आता होणार नाही ही खंत मला कायम राहील.”
हेही वाचा : Lata Mangeshkar Passes Away Live : लतादीदींना श्रद्धांजली अर्पण करताना सर्वच क्षेत्रातील मान्यवर भावूक
“लतादादींची गाणी भविष्यातही चाहत्यांना आनंद देत राहतील आणि त्या आपल्या गायनाने सर्वांच्या आठवणीत चिरकाल राहतील. लता दीदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही सर्वजण मंगेशकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत,” असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.