मुंबई : पुढच्या पिढीला बदलायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षणाच्या दर्जामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी मुंबई महानगरपालिका विविध स्वयंसेवी संस्थांसमवेत काम करीत आहे. तसेच दर्जेदार शिक्षणाचे पवित्र काम मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधून उत्तमप्रकारे सुरू आहे. यंदा पार पडलेल्या माध्यमिक शालान्त परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी व शिक्षकांची कामगिरी कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी काढले.
हेही वाचा >>> “तो पैसा कोणाचा?” मुंबईत येताच अदाणी प्रकरणावरून राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना तीन सवाल
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील माध्यमिक शालान्त परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. आगामी वर्षात मुंबईतील सर्व शाळा अद्ययावत करण्याचे उद्दिष्ट आहे. राज्य शासन राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतनावर सुमारे १ लाख ४२ हजार कोटी रुपये खर्च करीत असून त्यातील सुमारे ६२ हजार कोटी रुपये केवळ शिक्षण विभागावर खर्च करते. यामध्ये विद्यार्थ्यांना निशुल्क पुस्तके, वह्या, गणवेश, बूट आदी विविध शालेय साहित्य उपलब्ध करून दिले जाते. विद्यार्थ्यांवरील मानसिक ओझे कमी करणे, विद्यार्थ्यांना व्यवसायिक शिक्षण देणे यासाठी विविध उपक्रम राबवले जात असून ५० हजार शिक्षकांची भरती करण्याचे नियोजन आहे, असेही केसरकर यांनी सांगितले. पुढील वर्षी १५० पेक्षा अधिक शाळांचा निकाल ८५ टक्क्यांहून अधिक लागेल. असा आशावाद सह आयुक्त गंगाथरण डी. यांनी व्यक्त केला.
हेही वाचा >>> “अदाणी देशातली विमानतळं, बंदरं खरेदी करतायत, परंतु पैसा…”, मुंबईत येताच राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
मुंबई शहर व उपनगरांतील महानगरपालिकेच्या एकूण २४९ शाळा असून यापैकी एकूण ५९ विद्यार्थ्यांनी २०२३ च्या माध्यमिक शालात परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे कौतुक करण्यासाठी या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्यात, १०० टक्के निकाल लागलेल्या महानगरपालिकेच्या ४१ शाळा, ९५ ते ९९ टक्के निकाल लागलेल्या ३२ शाळा, ९० ते ९४.९९ टक्के निकाल लागलेल्या ३८ शाळा, ८५ ते ८९.९९ टक्के निकाल लागलेल्या ४४ शाळांचा रोख रक्कम देऊन विशेष सन्मान करण्यात आला. तसेच, गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक, सन्मानचिन्ह, शब्दकोश देऊन गौरविण्यात आले. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधून प्रथम येणाऱ्या २५ विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. या २५ विद्यार्थ्यांचा पदवीपर्यंतचा शैक्षणिक खर्च मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात येणार आहे. दादर येथील योगी सभागृहात विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्याला सह आयुक्त गंगाथरण डी., सहाय्यक आयुक्त चक्रपाणी अल्ले, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजू तडवी आदी विविध संबंधित अधिकारी उपस्थित होते.